माकडांवर यशस्वी ठरली कोरोनावरील लस – ऑक्सफर्ड वैज्ञानिक

ऑक्सफर्ड यूनिव्हर्सिटीचे वैज्ञानिक कोरोना व्हायरसवरील लस बनविण्याच्या अगदी जवळ पोहचले आहेत. ऑक्सफर्ड यूनिव्हर्सिटीने कोरोना व्हायरसच्या लसीचे प्राण्यांवर केलेले परिक्षणाचे परिणाम प्रकाशित केले आहेत. या परिणामात सांगण्यात आले की चॅडॉक्स-1 लस फुफ्फुसांना नुकसान होण्यापासून रोखण्यासाठी फायदेशीर ठरत आहे. या व्यतिरिक्त रोगप्रतिकारक प्रणालीशी संबंधित कोणत्याही रोगाचे संकेत दिसले नाहीत. 6 माकडांना कोरोना व्हायरसचे उच्च डोस देऊन त्यांना संक्रमित करण्यात आले होते.

या लसीचे 13 मे पासून मनुष्यावर देखील ट्रायल सुरू करण्यात आले आहेत. या ट्रायलमध्ये 1000 जण सहभागी झाले होते. लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रोपिकल मेडिसिनमधील फार्मा को-एपिडिमोलॉजीचे प्रा. स्टीफन इव्हान्स यांच्यानुसार, या अभ्यासाच्या निकालाने चांगली बातमी दिली आहे. या अभ्यासाचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की व्हायरल लोड आणि न्यूमोनियाविरूद्ध लसीच्या परिणामासह कोणत्याही आजाराचे संकेत मिळाले नाहीत.

किंग्स कॉलेज लंडनमधील प्राध्यापक डॉ. पेनी वार्ड म्हणाले की, “माकडांवरील कोरोना लसीच्या ट्रायल दरम्यान फुफ्फुसातील इतर कोणत्याही आजाराचा पुरावा मिळालेला नाही.  सार्स लसी दरम्यान रेस्पीरेटरी ट्रॅक्टमध्ये संक्रमणाचे पुरावे मिळाले होते, परंतु माकडांना देण्यात आलेल्या लसीनंतर निमोनियाची कोणतीही चिन्हे आढळली नाहीत.

लसीचे मानवी ट्रायल सुरू झाल्यानंतर देखील अमेरिका आणि ब्रिटनमध्ये प्राण्यावर ट्रायल करण्यात येत आहे. कोरोनाच्या विरोधात लस पुर्णपणे काम करते की नाही, हे वैज्ञानिक तपासत आहेत. याचे उलट परिणाम देखील दिसू शकतात.  प्राण्यांवरील ट्रायलचे परिणाम मनुष्यावर देखील तसेच लागू होतात का ?, या प्रश्नाचे उत्तर देताना प्रा. इव्हान म्हणाले की, आपण अचूकरित्या हे सांगू शकत नाही. त्यामुळेच ट्रायल करणे आवश्यक आहे. याचे परिणाम नकारात्मक आल्यास मनुष्यावर होणाऱ्या ट्रायलमध्ये समस्या येते. मात्र आता वैज्ञानिक क्लिनिकल ट्रायलच्या तिसऱ्या टप्प्यात आहेत.

ब्रिटन कोरोनावरील लसीच्या अगदी जवळ आहे. वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की ट्रायलसोबतच जगभरात 7 सेंटरमध्ये लसीची निर्मिती सुरू झाली आहे. भारतात पुण्यातील सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया देखील लसीचे मोठ्या प्रमाणात निर्मिती करण्याच्या तयारीत आहे.

Leave a Comment