बॅगेत पॅक होणारी इलेक्टिक बाईक ‘पोईमो ‘

फोटो साभार नवभारत टाईम्स

आज अनेक प्रकारच्या युनिक बाईक, स्कूटर्स पाहायला मिळत असल्या तरी फोल्ड करून बॅगेत पॅक करता येईल अशी बाईक दिसली नव्हती. जपानच्या टोक्यो विद्यापीठातील संशोधकांनी अशी एक इलेक्ट्रिक बाईक तयार केली असून तिचे नामकरण पोईमो असे केले गेले आहे. सध्या तिचा प्रोटोटाईप सादर केला गेला आहे मात्र लवकरच तिचे व्यावसायिक पातळीवर उत्पादन होऊ शकेल असा दावा केला जात आहे.

ही बाईक कमी किंवा मध्यम अंतर धावू शकेल अश्या पद्धतीने तयार केली गेली आहे. पोर्टेबल आणि इनफ्लॅटेबल मोबिलिटी या दोन्हीच्या नावातून तिचे नाव तयार केले गेले आहे. ती वजनाला कमी असावी, कमी जागेत मावावी, आणि लोकांना सार्वजनिक वाहनातून ती सहज नेता यावी हे ध्यानात घेऊन ती तयार केली गेली आहे. लास्ट माईल कनेक्टीव्हीटी साठी तिचा वापर करता येणार आहे.

ही बाईक थर्मोप्लास्टिक पॉलीयुरेथीन फॅब्रिक पासून बनविली गेली असून इनफ्लॅटेबल रेक्टँग्युलर फॅब्रिक फ्रेमचा वापर त्यासाठी केला गेला आहे. छोट्या इलेक्ट्रिक पंपासह ती मिळेल. १ मिनिटात या पंपांच्या सहाय्याने ती फुगविता येते. त्याला छोटी इलेक्ट्रिक मोटर आणि फ्रेमखाली छोटी रबरी चाके आहेत. वायरलेस कंट्रोल दिला गेला आहे. या बाईकचे वजन ५.४४ किलो असून भविष्यात ती आणखी हलकी बनविली जाईल असे सांगितले जात आहे.

Leave a Comment