अर्जेंटिना मध्ये व्हर्चुअल संसद, तर न्यूझीलंडमध्ये केशकर्तनालयात गर्दी

फोटो साभार भास्कर

करोनाच्या महामारीतून बाहेर पडत असलेले काही देश आता लॉकडाऊन शिथिल करत आहेत आणि अनेक देशांनी करोना मुळे त्याच्या दैनंदिन कार्यक्रमासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून घेतला असल्याचे दिसून येत आहे. अर्जेंटिनाने प्रथमच संसदेचे कामकाम व्हर्चुअल म्हणजे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या सहाय्याने पार पाडले आणि त्याला ७२ पैकी ७० सदस्य म्हणजे ९७ टक्के उपस्थिती होती. त्यासाठी संसद इमारतीत दोन मोठे स्क्रीन लावले गेले होते. एका स्क्रीनवर भाषण आणि व्होटिंगची सुविधा होती तर दुसरा खासदारांचे रजिस्ट्रेशन आणि ओळखपत्र तपासणीसाठी वापरला गेला. संसदेत प्रत्यक्षात अगदी थोडे खासदार उपस्थित होते.

अर्जेंटिना मध्ये करोनाचे ६८७९ संक्रमित सापडले असून ३४४ मृत्यू झाले आहेत. २३८५ रुग्ण करोना मधून पूर्ण बरे झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार जगातील २३ देशात याच प्रकारे म्हणजे व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संसद सत्रे, पॅनल मिटींग घेतल्या जात आहेत.

दुसरीकडे करोनावर वेळीच उपाय योजना करून लॉक डाऊन मधून बाहेर येण्यात यश मिळविलेल्या न्यूझीलंड मध्ये गेल्या तीन दिवसात एकही नवी केस समोर आलेली नाही. न्यूझीलंड मध्ये ५१ दिवस लॉकडाऊन होता मात्र अजूनही सोशल डीस्टन्सिंग, एका जागी १० पेक्षा अधिक लोकांनी जमा न होणे, मास्क वापरणे अशी बंधने आहेत. लॉक डाऊन संपताच नागरिकांनी रात्री १२ वा. हेअर कटिंग सलून समोर रांगा लावलेल्या दिसून आल्या. देशात मॉल, दुकाने, रेस्टोरंट उघडली जात आहेत मात्र नियमांचे पालन करूनच त्याचा लाभ नागरिकांना घेता येणार आहे. पंतप्रधान जेसिंदा अर्दन यांनी देशासमोर करोना मुळे अवघड आर्थिक आव्हाने असल्याचे सांगितले आहे. थंडीचा काळ अवघड असेल पण तरीही अर्थव्यवस्था गतीपूर्ण करण्यासाठी सर्व ते प्रयत्न केले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. न्यूझीलंड मध्ये करोनाच्या १४९७ केसेस होत्या आणि २१ मृत्यू झाले आहेत.

Leave a Comment