कोरोनामुळे होऊ शकतो 5 लाख AIDS च्या रुग्णांचा मृत्यू – WHO      

जगभरात कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. अद्याप या व्हायरसवर उपचार सापडलेला नाही. मात्र आता एका अभ्यासात धक्का माहिती समोर आली आहे. यानुसार कोरोना व्हायरसमुळे 5 लाख एड्सग्रस्तांचा मृत्यू होऊ शकतो. जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि यूएनएड्सने मॉडेलिंग अभ्यासानुसार अंदाज वर्तवला आहे की आफ्रिकेच्या सब-सहारा भागात पुढील 6 महिन्यात 5 लाख एड्सग्रस्तांचा मृत्यू होऊ शकतो.

2010 पासून आतापर्यंत आफ्रिकेत एचआयव्हीचे संक्रमण 43 टक्के कमी झाले आहे. अँटीरेट्रोव्हायरल औषधामुळे हे शक्य झाले होते. मात्र औषध आणि उपचार योग्य वेळी न मिळाल्यास, पुढील सहा महिन्यात मोझाम्बिकमध्ये 37 टक्के रुग्ण वाढतील. मलावी आणि झिम्बॉब्वेमध्ये प्रत्येकी 78 टक्के आणि यूगांडामध्ये 104 टक्के मुले एचआयव्ही संक्रमित होऊ शकतात.

संघटनेने आपल्या अभ्यासात सांगितले की, 2018 मध्ये सब-सहारा आफ्रिकेमध्ये 2.57 कोटी एचआयव्हीग्रस्त राहत होते. यात 64 टक्के अँटीरेट्रोव्हायरस थेरेपीच्या मदतीने जिंवत आहेत. आता कोरोनामुळे येथील आरोग्य प्रणाली बिघडली आहे. एचआयव्ही क्लिनिकवर अँटीरेट्रोव्हायरसचा पुरवठा होत नाही. एड्सग्रस्तांना औषधांचा डोस मिळत नाही आहे.

संघटनेचा अभ्यास दर्शवतो की एड्स, टीबी, मलेरिया सारख्या आजारांनी ग्रस्त लोकांना कोरोनाचा मोठा धोका आहे. हे लोक कोरोनाने ग्रस्त नसले तरीही त्यांना यामुळे समस्या येत आहे. डब्ल्यूएचओचे महासंचालक डॉ. टेड्रोस घेब्रेसस म्हणाले की, हा रिपोर्ट एक वेगळी स्थिती दर्शवतो. आफ्रिकेत जर एड्सग्रस्त 5 लाख लोकांचा मृत्य झाल्यास, आपण पुन्हा इतिहासात ढकलले जाऊ. केवळ कोरोनाच नाही तर इतर आजारांनी ग्रस्त लोकांना वाचवायला हवे.

आफ्रिकेत एचआयव्ही पसरण्याचा धोका देखील वाढला आहे. कारण येथे निरोध, एआरव्ही थेरेपी, टेस्टिंग किट्सची कमतरता भासत आहे.

Leave a Comment