तुम्ही जर एवढे मोठे नेते आहात, तर तुम्ही कोल्हापूरातून का निवडणूक लढवली नाही?


मुंबई – एकीकडे राज्यावर कोरोनासारख्या महामारीचे संकट आहे, तर दुसरीकडे राज्यातील वातावरण विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे तापू लागले होते. पण आता निवडणूक बिनविरोध असल्यामुळे ते वातावरण शांत झालेले असतानाच भाजपमधील नाराजांची नाराजी समोर येऊ लागली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने आपले उमेदवार घोषित केल्यानंतर ही नाराजी उफाळून आली. राज्यातील पक्षाच्या काही नेत्यांना भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी चांगलेच धारेवर धरले होते. त्याला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिल्यानंतर खडसे यांनी पुन्हा त्यांच्यावर पलटवार केला आहे.

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राज्यातील भाजप नेत्यांवर विधान परिषद निवडणुकीत निष्ठावंतांना डावलत उपऱ्यांना संधी दिल्याबद्दल निशाणा साधला होता. आपल्याला उमेदवारी राज्यातील नेत्यांमुळेच नाकारण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या आरोपाला उत्तर दिले. पक्षाने एकनाथ खडसे यांना भरपूर काही दिल्याचे सांगत खडसे यांच्याविषयीची यादीच त्यांनी सांगितली होती. त्याचबरोबर आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत खडसे यांनी राहावे, असे म्हटले होते.

चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिक्रियेला आता एकनाथ खडसे यांनी उत्तर दिले आहे. खडसे एका मुलाखतीत बोलताना म्हणाले, मार्गदर्शकाच्या भूमिकेत मी होतो आणि यापुढेही कायम राहिल. चंद्रकांत पाटील हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले, तेव्हा त्यांचा पक्षाशी संबंध आला. चंद्रकांत पाटील यांचा गेली ४० वर्षे भाजपशी काडीमात्र संबंध नव्हता. ते संघाच्या माध्यमातून विद्यार्थी परिषदेचे काम करत होते. त्यांना भाजपचे जुने नवे कार्यकर्ते माहिती नव्हते. भाजपच्या उमेदवारांचे डिपॉझिट ज्या काळात जप्त होत होते, त्या काळात आम्ही निवडून येत होतो, असे खडसे म्हणाले.

जेव्हा १९८० मध्ये भाजपचा एकही सरपंचही नव्हता, मी तेव्हा भाजपमधून पंचायत समितीचा सदस्य होतो. त्याकाळी भाजपचा उमेदवार उभा राहिला की, तो हरणारच गणित झाले होते. मी अशा काळापासून पक्षासाठी काम केले आहे. त्यामुळे आम्ही मार्गदर्शकाच्या भूमिकेत कायम आहोत. विद्यार्थी परिषदेचे चंद्रकांत पाटील यांनी एवढे काम केले असेल, तर त्यांनी मेधा कुलकर्णीचे आमदारकीचे तिकीट कापून स्वतः उभे राहायला नको होते. स्वार्थासाठी मेधा कुलकर्णींचा त्यांनी बळी दिला. तुम्ही जर एवढे मोठे नेते आहात, तर तुम्ही कुठूनही निवडून यायला हवे. त्यांनी कोल्हापूरमधून का नाही निवडणूक लढवली?, असा सवाल एकनाथ खडसे यांनी केला आहे.

Leave a Comment