12 जूनला ओटीटीवर रिलीज होणार गुलाबो सिताबो


कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशभरात लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे सिनेसृष्टीला देखील सर्वात मोठा फटका बसला आहे. लॉकडाऊनमुळे चित्रपटांचे चित्रीकरण तर बंदच आहे, त्याचरोबर थिएटर्स देखील बंद आहेत. रसिकांची मनोरंजन ही गरज असली तरी ती ओटीटीमुळे प्राधान्यात आघाडीवर उरलेली नाही. चित्रपट पाहावे वाटणे ही गरज आता खूप तळाला गेली आहे. वाढणारा लॉकडाऊन आणि त्यानंतर उघडणारी थिएटर्स याला आता सप्टेंबर महिना उजाडेल असे काहीसे सिनेसृष्टीला वाटू लागले आहे.

त्यातच पूर्ण झालेले चित्रपट राखून ठेवण्यापेक्षा जो पर्याय सापडत आहे, तो घेण्याकडे लोकांचा कल आहे. म्हणूनच ओटीटीची वाढती मागणी सध्या लक्षात घेऊन अनेक महत्वाचे हिंदी चित्रपट या प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यावर कल दिसतो. गुलाबो सिताबो या चित्रपटाच्या निमित्ताने त्याचा प्रत्यय आला आहे. अमेझॉन प्राईमने हा चित्रपट घेतला असून तो 12 जूनला ओटीटीवर रिलीज होणार आहे.

या चित्रपटात अमिताभ बच्चन, आयुष्मान खुराना यांच्या मुख्य भूमिका आहेत. शुजित सरकार याचे दिग्दर्शक असून त्यांनी काही दिवसांपूर्वीच आपला चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला तरी चालेल असे वक्तव्य केले होते. गुलाबो सिताबोपाठोपाठ अक्षयकुमारचा लक्ष्मी बॉम्ब हा चित्रपटही ओटीटीवर येणार आहे. त्याशिवाय नवाजुद्दीन सिद्दीकीचा घूमकेतूचे हक्कही ओटीटीने घेतले आहेत. अॅमेझॉन प्राईम तयार चित्रपट घेण्यात आघाडीवर आहे. सोबत नेटफ्लिक्सनेही चित्रपट घेण्यासाठी कंबर कसली आहे. नेटफ्लिक्स कतरिना कैफचा सुपरहिरो हा चित्रपटही घेणार असल्याच्या बातम्या आहेत. यापूर्वी इरफान खानचा अंग्रेजी मिडियम हा चित्रपट ओटीटीने घेतला होता. हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर दोनच दिवसांतच लॉकडाऊनमुळे थिएटर्स बंद करावी लागली होती. त्यामुळे त्यानंतर हा चित्रपट ओटीटीवर रिलीज करण्यात आला. तर मराठीमध्ये एबी आणि सीडी हा चित्रपटही ओटीटीवर आला आहे.

Leave a Comment