गोवा फक्त श्रीमंत पर्यटकांसाठी उघडणार, पर्यटन मंत्र्यांना या वक्तव्यावरून नेटकऱ्यांनी केले ट्रोल

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका पर्यटन व्यवसायाला बसला आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्याला देखील याचा मोठा फटका बसला आहे. मात्र लवकरच गोव्याचे पर्यटन पुन्हा एकदा पुर्वपदावर येण्याची शक्यता आहे. असे असले तरी केवळ ठराविक पर्यटकांनाच प्रवेश मिळण्याची शक्यता आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, लॉकडाऊन 3 नंतर आंतर-राज्य बस आणि रेल्वे सेवा सुरू होईल. सोबतच विमानसेवा देखील सुरू करण्यात येईल, मात्र काही निर्बंध असतील. कारण कोरोनाग्रस्तांची अधिक संख्या असलेले कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांनी गोवा वेढलेला आहे.

गोव्याचे पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर म्हणाले की, पर्यटन पुन्हा सुरू करण्यासाठी आपल्याला गोव्याला पुन्हा 1960 च्या दशकाप्रमाणे करावे लागेल. 1960 च्या दशकात गोवा सुंदर होते आणि आता 2020 मध्ये 80 लाख पर्यटकांमुळे गोवा बददले आहे.

ते पुढे म्हणाले की, आम्ही तज्ञांबरोबर मिळून गोव्याला 1960 चे वैभव प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्हाला असे पर्यटक नको आहेत जे ड्रग्स घेतात, रस्त्यावर जेवण बनवतात आणि समुद्रकिनाऱ्यावर धिंगाणा घालतात. आम्हाला असे पर्यटक हवे जे श्रींमत आहेत व गोवा आणि येथील संस्कृतीचे कौतुक करतात. आपल्याला शून्यातून सुरूवात करावी लागणार आहे. राज्यांतर्गत प्रवास सुरू होत नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. जेव्हा लस तयार होईल, तेव्हाच गोव्यातील पर्यटन सुरू होईल असे वाटते.

मात्र नेटकऱ्यांना पर्यटनमंत्री आजगावकर यांचे केवळ श्रीमंताना प्रवेश देण्याचे वक्तव्य आवडले नाही. अनेक युजर्सनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Leave a Comment