पुढील दोन महिन्यांसाठी प्रवासी मजुरांना मिळणार मोफत धान्य – निर्मला सीतारामन


नवी दिल्ली – सलग दुसऱ्या दिवशी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहिर केलेल्या आर्थिक पॅकेजसंदर्भात काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. शेतकरी आणि मजुरांबरोबर छोट्या दुकानदारांसाठी त्यामध्ये भरीव मदत जाहीर करण्यात आली आहे. 20 लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यानंतर त्याविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी निर्मला सीतारामन आणि अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेतली.

त्यानुसार झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रवासी मजुरांना पुढील दोन महिन्यांसाठी मोफत धान्य पुरवठा केला जाईल अशी घोषणा केली. त्याचबरोबर त्यांनी ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही अशानाही धान्य मिळणार असल्याचे स्पष्ट केले आहे. गरीबांना प्रति महिना ५ किलो धान्य दिले जाणार असल्याचे निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले. ८ कोटी प्रवासी मजुरांना याचा फायदा होईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. आम्ही आगामी काळात वन नेशन आणि वन रेशन कार्ड ही योजनाही आणत असल्यामुळे उद्या जर असे काही संकट आपल्या समोर उभे राहिले तर गरीब जनतेला देशातील कोणत्याही रेशन दुकानामधून सहजरित्या धान्य उपलब्ध होऊ शकेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

केंद्र सरकारला स्थलांतरित मजुरांची काळजी असून त्यांच्यासाठी आम्ही निवारा केंद्र उभारली आहेत. त्याचबरोबर त्यांच्या तीनवेळच्या जेवणाची व्यवस्था केली असून त्यांच्या आरोग्य चिकित्सेचीही व्यवस्था केल्याची माहिती आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. त्याचबरोबर त्यांनी या सगळ्या गोष्टी मागील दोन महिन्यात करण्यात आल्याचे स्पष्ट केले. १२ हजार बचतगटांकडून ३ कोटी मास्क आणि दीड लाख लीटर पर्यंत सॅनिटायझरची निर्मिती केल्याची माहिती देखील निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. ७ हजार २०० बचतगटांची गेल्या दोन महिन्यात स्थापना झाल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. वर्षातून एकदा स्थलांतरित मजुरांची आरोग्य तपासणी केली जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान निर्मला सीतारामन यांनी स्थलांतरित मजूर, गरीब, फेरीवाले, छोट्या प्रमाणात शेती करणारे शेतकरी यांच्यासाठी घोषणा होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आजच शेतकऱ्यांसाठी दोन घोषणा असल्या तरीही पुढेही त्यांच्यासाठी घोषणा करण्यात येणार आहेत. निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच मोदी सरकार शेतकऱ्यांना विसरले असे कुणीही म्हणू नये, असे स्पष्ट केले. हे सरकार गरीबांच्या कल्याणासाठीच आहे. त्याचबरोबर गरीब कल्याण योजनेतूनही स्थलांतरीत मजुरांना मदत देण्यात येईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Comment