सार्वजनिक वाहतूक क्षेत्रातील कोरोना व्हायरसच्या संक्रमणाचा धोका टाळण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार कॉमन मोबिलिटी कार्ड सेवा सुरू करण्याचा विचार करत आहे. दिल्ली, अहमदाबाद आणि बंगळुरू या मेट्रो शहरांमध्ये ही सेवा पहिल्यापासूनच आहे. या कार्डचा उपयोग मेट्रो, बस, रेल्वे, टोल, पार्किंग, स्मार्ट सिटी आणि किरकोळ दुकानांवर देखील करता येईल.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी वापरले जाऊ शकते ‘कॉमन मोबिलिटी कार्ड’
या कार्डद्वारे तिकीट काउंटरवरील गर्दी, कंडक्टरशी व्यवहार, टोल अथवा पार्किंग शुल्क या गोष्टींपासून सुटका झाल्याने, संसर्गचा धोका देखील कमी होईल. केंद्र सरकारच्या वाहतूक विभागातील एका अधिकाऱ्यानुसार सार्वजनिक परिवहनाच्या बाबतीत कॉमन मोबिलिटी कार्ड आज सर्वात उपयुक्त आणि सुरक्षित सेवा आहे. याबाबत अमर उजालाने वृत्त दिले आहे.
कोरोनाच्या संक्रमणाचा धोका सर्वाधिक प्रमाणात बस स्टँड, रेल्वे स्टेशन, टोल आणि पार्किंग इत्यादी गर्दीच्या ठिकाणीच असेल. सार्वजनिक वाहतुकीत संसर्गाचा सर्वाधिक धोका आहे, त्यामुळे प्रवास करताना विशेष काळजी घ्यावी लागेल. जगभरात सिंगापूर, न्यूयॉर्क, पॅरिस, सिडनी, पर्थ, लंडन आणि मेलबर्न सारख्या अनेक शहरांमध्ये या कार्डचा वापर केला जातो.
कॉमन मोबिलिटी कार्ड सेवा सुरू करण्याबाबत केंद्राने सर्व राज्यांशी चर्चा केली असून, अधिकांश राज्य याबाबत सकारात्मक आहेत. हे कार्ड डेबिट-क्रेडिट कार्ड सारखेच असेल. हे पुर्णपणे कॉन्टॅक्ट लेस कार्ड असेल. म्हणजेच यावर कोणतीही वैयक्तिक माहिती नसेल. या कार्डच्या मदतीने बस, मेट्रो आणि दुसऱ्या सार्वजनिक वाहनांचे शुल्क देण्यासोबतच शॉपिंग देखील करता येईल. या कार्डद्वारे पैसे देखील काढता येतील.