18 तारखेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा पुन्हा शपथविधी


मुंबई : देशासह राज्यावर कोरोनाचे संकट ओढावलेले असतानाच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर त्यांच्या सदस्यत्वावरुन वाद उभा राहिला होता. पण विधान परिषद निवडणूक अखेर बिनविरोध झाल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा मार्ग मोकळा झाला असून उद्धव ठाकरे बिनविरोध विधान परिषदेचे आमदार म्हणून निवडून आले आहेत.

दरम्यान सोमवारी 18 मे रोजी दुपारी 1 वाजता विधान परिषद सभापतींच्या उपस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेणार आहेत. विधान परिषद निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे सर्व 9 उमेदवारांचा शपथविधी सोहळा सोमवारी विधान परिषदेत सभापतींच्या उपस्थित पार पडणार आहे. मुख्यमंत्रिपदाची उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतल्या नंतर सहा महिन्यांच्या कालावधीच्या आत ते आमदार म्हणून शपथ घेणार आहेत. त्यांच्या सोबतच महाविकास आघाडी आणि भाजपचे बिनविरोध निवडून आलेले उमेदवारही शपथ घेणार आहेत.

शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर राष्ट्रवादीकडून अमोल मिटकरी आणि शशिकांत शिंदे यांनी विधान परिषदेवर सदस्य म्हणून निवड झाली आहे. तर काँग्रेसकडून राजेश राठोड यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांचीही बिनविरोध निवड झाली आहे.

भाजपकडून यावेळी चार सदस्य असणार आहेत. विधानपरिषदेसाठी भाजपकडून यावेळी ज्येष्ठ नेत्यांना तिकीट डावलण्यात आली आहेत. त्यांच्या जागी नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. रमेश कराड, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रणजितसिंह मोहिते यांची विधान परिषद सदस्य म्हणून निवड झाली आहे. डॉ. अजित गोपचडे यांनी अर्ज दाखल केला होता परंतु, ऐनवेळी त्यांनी माघार घेतल्यामुळे रमेश कराड यांची निवड झाली.

Leave a Comment