महाराष्ट्रात निमलष्करी दलाच्या तैनातीस मंजुरी

करोनाचा वाढता प्रादुर्भाव, लॉक डाऊन, रेड झोन जिल्ह्यांची मोठी संख्या आणि राजधानी मुंबईत कोविड १९ वर नियंत्रण मिळविण्यात येत असलेल्या अडचणी या साऱ्या गोष्टीच्या विचार करून राज्याचे मंत्री अनिल देशमुख यांनी केंद्राकडे अर्धसैनिक बलाच्या किमान २० तुकड्या तैनात करण्याची मागितलेली मदत केंद्राने मंजूर केली असून या निमलष्करी दलातील २ हजार सैनिक मुंबई सह राज्याच्या अन्य जिल्ह्यात लवकरच दाखल होतील असे समजते.

 

मुंबई मध्ये कोविड १९ चा उद्रेक मोठा आहे. अनेक भाग रेड झोन आहेत आणि ते सील केले गेले आहेत. राज्याचे पोलीस दल अहोरात्र बंदोबस्तात तैनात आहे. गेले अनेक दिवस अजिबात विश्रांती न मिळाल्याने पोलीस थकले आहेतच पण सुमारे १०० अधिकारी आणि ८५०० पोलिसना करोनाची लागण झाली आहे. त्यातच आता ईदचा सण तोंडावर आला आहे आणि मान्सून उंबरठ्यावर ठेपला आहे. त्यामुळे पोलिसांना कामाचा प्रचंड ताण आहे. यासाठी निमलष्करी दलाची मागणी राज्य सरकारने केंद्राकडे केली होती.

 

महाराष्ट्र कोविड १९ संदर्भात देशातील सर्वाधिक बाधित राज्य ठरले असून राज्यात कोविड संक्रमण झालेल्यांची संख्या २५ हजारावर गेली आहे. बुधवारच्या एका दिवसात या साथीने आणखी ५४ लोकांचा बळी घेतला असून त्यात मुंबईतील ४० बळी आहेत. राज्यात एकूण संक्रमित २५९२२ असून आत्तापर्यंत ९७५ मृत्यू झाले आहेत तर बुधवारी ४२२ रुग्ण बरे झाले आहेत. बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ५५४७ इतकी आहे. राज्य सरकारने जेल मध्ये बंद असलेल्या ३५ हजार पैकी १७ हजार कैद्यांना तात्पुरत्या पॅरोल वर सोडण्याचा निर्णय घेतला असून यापूर्वी कच्च्या कैदेतील ५००० कैदी सोडले गेले आहेत. ४२ हजार प्रवासी मजुरांना त्याच्या घरी जाण्यासाठी ३५ विशेष रेल्वे सोडल्या जात आहेत.

 

मुंबईत सध्या ४० हजार पोलीस तैनात आहेत तर राज्यात अन्यत्र दोन हजार पोलीस तैनात आहेत. राज्यात १६ जिल्हे रेड झोन मध्ये आहेत असेही समजते.

Leave a Comment