या व्यक्तीने तयार केले पाण्यावर तरंगणारे ट्रायसिकल घर

एका लॅटवियन लँडस्केप आर्किटेक्टने पाण्यावर तरंगण्याची क्षमता असलेली बॅटरीवर चालणारी ट्रायसिकल तयार केली आहे. ही ट्रायसिकल जमीन आणि पाण्यावर देखील चालते. ही हटके ट्रायसिकल तयार करणाऱ्या आयगर्स लॉझिसने सायकलवरून लंडन ते टोकिया प्रवासासाठी 4 वर्ष घालवली आहेत. तेव्हाच त्याने अशाप्रकारे सायकल तयार करण्याचा निर्णय घेतला.

आयगर्स लॉझिसने दोन 250 वॉट बॅटरी हब्स सोलर पॅनेल आणि इलेक्ट्रिक बोट इंजिनच्या मदतीने ही ट्रायसिकल तयार केली.

लॉझिसने याविषयी सांगितले की, ही सायकल पाणी आणि जमीन दोन्हीवर वापरता येते. ही तुम्हाला एक वेगळाच अनुभव देते, कारण याच्यासारखे दुसरी कोणती गोष्टच नाही. यामुळे तुम्हाला कशावर अवलंबून राहावे लागत नाही.

या झेड-ट्रिटॉनमध्ये दोन व्यक्ती बसू शकतील एवढी जागा आहे. सोबतच यात किचन देखील आहे. लॉझिस म्हणाला की, सायकलला एकदा चार्ज केल्यावर तुम्ही जमिनीवर 40 किमी आणि त्यानंतर पाण्यावर आणखी 10 किमी प्रवास करू शकता. यानंतर पुन्हा चार्ज करून तुम्ही पुढचा प्रवास करू शकता. यासोबत तुम्ही जगभर प्रवास करू शकतात.

Leave a Comment