चंद्रकांत पाटील यांचे भाजपसाठी शून्य योगदान; एकनाथ खडसेंचा पलटवार


मुंबई : काहीवेळा पूर्वीच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंना विधान परिषदेचे तिकीट का मिळाले नाही याची कारणमिमांसा केल्यानंतर माझ्या घरात फक्त मला आणि माझ्या सुनेलाच भाजपकडून उमेदवारी दिली असून विधानसभेला माझ्या मुलीला भाजपने दिलेली उमेदवारी मी मागितली नव्हती. मी वारंवार त्यांना माझ्या मुलीला तिकीट देऊ नका असे सांगितले होते. तरी देखील जबदस्तीने त्यांनी माझ्या मुलीला तिकीट दिले, म्हणजे आमच्यावर उपकार केले नाहीत. आम्हाला पक्षाने भरपूर काही दिले हे मान्य आहे, मग आम्ही पक्षासाठी काहीच केले नाही का? असा सवाल भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी विचारला. त्याचबरोबर भाजपसाठी चंद्रकांत पाटील यांचे शून्य योगदान असून विद्यार्थी परिषदेत त्यांचे मोठे योगदान आहे. तरी देखील भाजपने त्यांचा स्वीकार केलाच ना, असेही एकनाथ खडसे म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नाथाभाऊ हे आमचे ज्येष्ठ नेते असून पक्षाच्या वाढीसाठी त्यांचे मोठे योगदान आहे. पण काही अपेक्षा न करता अनेकांनी कामे केली. त्याचबरोबर पक्षाकडून नाथाभाऊंना खूप काही मिळाले आहे. त्यांनी अनेकांची तिकीटं कापून स्वत:च्या घरात नेली, त्यावेळी त्यांनी खंजीर खुपसला नाही का? असे म्हटले. एकनाथ खडसे यांनी त्यावर उत्तर दिले.

एकनाथ खडसे म्हणाले की, एकासाठी एक आणि दुसऱ्यासाठी दुसरा निकष हे मला पटत नाही. चंद्रकांत पाटलांचा आदर करतो. त्यांनाच विचारायचे आहे की, उभा महाराष्ट्र पिंजून काढला, तळागाळात पोहोचलो, आंदोलने केली. पक्षात 40 वर्ष काम करत होतो, तेव्हा चंद्रकांत पाटील भाजपमध्ये होते का? ते विद्यार्थी परिषदेत होते. तरीही विद्यार्थी परिषद ही भाजप परिवारातील संघटना आहे म्हणून अध्यक्ष म्हणून मान्यता मिळाली की नाही? त्यांचे भाजपमध्ये शून्य योगदान आहे. विद्यार्थी परिषदेत त्यांचे मोठे योगदान आहे. तरी देखील त्यांचा भाजपने स्वीकार केलाच ना. त्याचबरोबर कोणत्या मेरिटवर गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिली असा सवाल एकनाथ खडसे यांनी विचारला. माझ्यासाठी राज्यसभेसाठी शिफारस केली होती. त्यावेळी तिकीट मिळाले नाही, तेव्हा देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेसाठी तिकीट देण्याचे आश्वासन दिले. मी त्यावेळी तिकीट मागितले नव्हते. मला पक्षाने अनेक पदे दिली त्याचे समाधान आहे. पण कोणत्या मेरिटवर पडळकरांना तिकीट दिले? भाजपला शिव्याशाप देणारे आमदारकीसाठी पात्र समजले जातात. मोहिते पाटलांचे आय़ुष्य राष्ट्रवादीत गेले आणि त्यांच्यासाठी मेधा कुलकर्णी यांचे देखील विधानपरिषदेचे तिकीट कापले.

Leave a Comment