चीनी पत्रकाराच्या प्रश्नावर भडकले ट्रम्प, अर्ध्यातून सोडली पत्रकार परिषद

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे मागील काही दिवसांपासून कोरोना व्हायरसवरून चीनवर सातत्याने टीका करत आहे. आता पत्रकार परिषदेमध्ये एका आशियाई-अमेरिकन महिला पत्रकाराने चीनबाबत विचारलेल्या प्रश्नामुळे ट्रम्प हे चांगलेच भडकलेले पाहण्यास मिळाले. एवढेच नाहीतर त्यांना पत्रकार परिषद देखील अर्ध्यातून सोडली.

पत्रकार परिषदेमध्ये सीबीएस न्यूजच्या महिला पत्रकार वीजिया जियांग यांना ट्रम्प यांना प्रश्न विचारला की, तुम्ही वारंवार अमेरिका अन्य देशांच्या तुलनेत सर्वाधिक टेस्टिंग करत आहेत यावर का जोर देत आहेत ? पत्रकाराने विचारले की, हे का म्हत्त्वाचे आहे ? दररोज अमेरिकन नागरिक आपले प्राण गमवत असताना ही जागतिक स्पर्धा का ?

या प्रश्नाला उत्तर देताना ट्रम्प म्हणाले की, जगभरात लोक प्राण गमावत आहेत. हा प्रश्न तुम्ही चीनला विचारायला हवा. मला विचारू नका, चीनला हा प्रश्न विचारा. यावर जियांग यांनी प्रतिप्रश्न करत ट्रम्प यांना विचारले की, सर, तुम्ही हे खास करून मलाच का सांगत आहात ? यावर ट्रम्प म्हणाले की, मी हे त्या सर्वांना सांगत आहे, जे असा वाईट प्रश्न विचारतात.

जियांग यांच्या ट्विटर बायोवरून समजते की, त्यांचा संबंध चीनशी आहे. त्यांनी आपल्या बायोमध्ये ‘चायनीज बोर्न वेस्ट वर्जिनियन’ असे लिहिले आहे.

ट्रम्प इतर पत्रकारांकडे पुढील प्रश्नासाठी बघत होते, मात्र जियांग त्यांच्याकडे प्रश्नाचे उत्तर मागत राहिल्या. यानंतर ट्रम्प यांनी अर्ध्यातूनच पत्रकार परिषद सोडली. या घटनेनंतर ट्विटरवर #StandWithWeijiaJiang ट्रेंड होऊ लागले व अनेकांनी ट्रम्प यांच्यावर वर्णभेदाचा आरोप केला.

Leave a Comment