टीव्ही, डिशवॉशर, फ्रीज, व्हॅक्युम क्लीनरला ऑनलाईन खरेदीत मागणी


लोकडाऊन काही प्रमाणात शिथिल झाल्यावर ऑनलाईन खरेदीत सर्वप्रथम कपडे, मोबाईल एक्सेसरीज ला अधिक मागणी दिसून आली होती मात्र आता हा ट्रेंड बदलला असून सध्या मोठ्या स्क्रीनचे टीव्ही, डिशवॉशर, फ्रीज, व्हॅक्युम क्लीनर या वस्तूंना अधिक मागणी असल्याचे दिसून आले आहे. ग्रोसरीची मागणी कायम आहे मात्र त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक वस्तूंना मागणी वाढली आहे.

इंडस्ट्री जाणकार सांगतात सध्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची चौकशी मोठ्या प्रमाणावर केली जात असून सोनी, सॅमसंग, पॅनासोनिक, व्हर्लपूल या कंपन्यांची उत्पादने अधिक सर्च केली जात आहेत. सोनीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील नायर म्हणाले, लॉकडाऊन मुळे लोक घरात आहेत, थियेटर, मॉल लवकर उघडण्याची शक्यता नाही यामुळे मोठ्या स्क्रीनच्या टीव्हीची मागणी वाढली आहे. आजपर्यंत युजर मोबाईलवर कंटेंट बघण्यास पसंती देत होते पण आता घरात असल्याने मोठा पडदा, चांगला आवाज यासह करमणूक कार्यक्रम बघणे त्यांना अधिक चांगले वाटत असावे.

या पूर्वी डिशवॉशर, व्हॅक्युम क्लीनर याना मेट्रो शहरात अधिक मागणी होती पण लॉकडाऊन मुळे कामवाल्या बायका येऊ शकत नाहीत हे लक्षात घेऊन डिशवॉशर, व्हॅक्युम क्लीनर यांची मागणी वाढली आहे. तसेच घरोघरी फ्रीज असले तरी या परिस्थितीत अधिक खाद्यपदार्थ साठवून ठेवता यावेत म्हणून ३०० लिटर व त्याहून अधिक क्षमतेच्या फ्रीजनाही मागणी वाढली आहे.

पंतप्रधानांनी काल सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी केलेल्या चर्चेनंतर लॉक डाऊन वाढण्याचे संकेत मिळाले आहेत त्यामुळे डिशवॉशर, फ्रीज, व्हॅक्युम क्लीनर याची मागणी आणखी वाढेल असेही सांगितले जात आहे.

Leave a Comment