करोना नियंत्रणात आरोग्य सेतू ठरले उपयुक्त


केंद्राने करोनाचा पत्ता लावण्यासाठी बनविलेले आरोग्य सेतू अॅप खुपच उपयुक्त ठरले असल्याचे दिसून आले आहे. या अॅप मुळे सुमारे दीड लाख युजर्सना ब्ल्यू टूथ संपर्कातून संक्रमित लोकांच्या तुम्ही जवळ आहात अशी धोक्याची सूचना मिळालीच शिवाय कोविड १९ साठी संभावित हॉटस्पॉट ठरू शकतील अश्या ६९७ जागांची माहितीही वेळेत मिळण्यास मदत झाली आहे.

समूह ९ चे अध्यक्ष अजय सहानी यांनी या संदर्भात बोलताना सांगितले की या अॅपची निर्मिती नागरिकांना करोना संक्रमिताच्या तुम्ही जवळ जात आहात याचा इशारा मिळण्यासाठीच प्रामुख्याने केली गेली असून नागरिकांचे वैयक्तिक जीवन सुरक्षित व्हावे हा त्याचा हेतू आहे. लोकांची खासगी माहिती सुरक्षित राहावी याचा विचार करूनच ते बनविले गेले आहे.

आजपर्यंत ९ कोटी ८० लाख नागरीकानी हे अॅप डाऊनलोड केले असून लवकरच ही संख्या १० कोटींचा टप्पा ओलांडेल असे संकेत मिळत आहेत. या अॅप मुळे नागरिकांना कोविड संक्रमितांच्या संपर्कात येण्यापूर्वीच धोक्याचा इशारा मिळतो आहेच पण स्वास्थ प्रणालीकडेही तसा संदेश जात आहे. या अॅपने सर्वाधिक वेगाने मोठ्या संखेने डाऊनलोड झालेले अॅप असे जागतिक रेकॉर्ड केले आहे. या अॅप मुळे कोणाचीही ओळख जाहीर होत नाही असेही सहानी म्हणाले.

गेल्या चोवीस तासात देशात ४२१३ नविन केस आढळल्या आहेत त्यामुळे या साथीच्या नियंत्रणावर अधिक लक्ष पुरविले जात असून आरोग्य अॅप त्यासाठी अधिकाधिक लोकांनी डाऊनलोड करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment