एवढ्या संपत्तीचे मालक आहेत राज्याचे मुख्यमंत्री


मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषद निवडणुकीसाठी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांच्यासह विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी देखील अर्ज भरला. राष्ट्रवादीकडून यावेळी शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. त्याचबरोबर त्यांनी आज शपथपत्रात स्वतःची आणि पत्नी रश्मी ठाकरे यांची एकत्रित संपती अधिकृत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अंदाजे 125 कोटी रुपयांची संपत्ती आहे. तर त्यांच्याकडे एकूण ३ बंगले आहेत. ज्यापैकी वांद्रे पूर्व कला नगर येथे ‘मातोश्री’ बंगला आणि ‘मातोश्री’च्या अगदी समोर बांधले जात असलेले नवे घर याचा समावेश आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांचे कर्जत येथे फार्म हाऊस आहे.

ठाकरे यांच्या उत्पन्नाचे विविध कंपन्यांचे भाग, विविध कंपन्यांमध्ये भागीदारी आणि त्यांचे डिव्हिडंड असे विविध स्रोत आहेत. त्याचबरोबर त्यांनी शपथपत्रात स्वतःच्या मालकीचे एकही वाहन नसल्याचे म्हटलं आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पोलिसांमध्ये एकूण 23 प्रकरणांची नोंद आहे. ज्यामधील 12 रद्द झाले असून बाकीच्या खाजगी तक्रारी आहेत.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यात त्यांना विधीमंडळाचे सदस्य व्हावे लागणार आहे. उद्धव ठाकरे हे आता विधानपरिषदेवर निवडून जाणार आहे. त्यासाठी त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ज्यामध्ये त्यांनी आपली संपत्ती जाहीर केली. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी जेव्हा विधानसभा निवडणूक लढवली तेव्हा त्यांनी त्यांची संपत्ती जाहीर केली होती. नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर शिवसेनेवर आरोप होते. त्यांनी थेट संपत्ती जाहीर करावी लागेल म्हणून ठाकरे निवडणूक लढत नाही, असा आरोप केला होता. त्यानंतर ठाकरे यांच्या संपत्तीची प्रामुख्याने चर्चा सुरु झाली होती.

Leave a Comment