कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात तायवानला हे ‘अस्त्र’ आले कामी

चीनच्या वुहान शहरातून सुरू झालेल्या कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. काही देशात या व्हायरसमुळे मोठे नुकसान झाले आहे. तर काही देश या व्हायरसच्या प्रसारावर नियंत्रण मिळविण्यास यशस्वी झाले आहेत. यातीलच एक देश म्हणजे तायवान.

चीनच्या जवळच असल्याने तायवानला कोरोनाचा मोठा धोका होता. मात्र आपले ठोस उपाययोजनांमुळे तायवानने व्हायरसवर नियंत्रण मिळवले आहे. येथे जवळपास 400 जणांना कोरोनाची लागण झाली असून, 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तायवानने आधीपासूनच काळजी घेण्यास सुरूवात केली होती व परदेशातून आलेल्यांना 14 दिवस घरात राहणे अनिवार्य केले होते.

मात्र तायवानकडे एक खास गोष्ट आहे. ती म्हणजे त्यांचे उपराष्ट्रपती. तायवानचे उपराष्ट्रपती चेन चिएन-जेन हे महामारीतज्ञ आहेत. त्यांनी अमेरिकेच्या जॉन्स हॉपकिन्स यूनिव्हर्सिटीमधून महामारी संबंधी प्रशिक्षण घेतले आहे. ते देशात पसरणाऱ्या संक्रमणावर लक्ष ठेवतात व लस आणि टेस्टिंग किट तयार करण्यावर जोर देत आहेत. तर दुसरीकडे चीनवर टीका देखील करत आहेत.

जगभरातील अनेक प्रमुख नेते व्हायरसबाबत विचित्र दावे करत असताना चेन हे विज्ञानाच्या आधारावर देश चालवत आहेत. 2003 मध्ये सार्स-व्हायरसच्या काळात ते तायवानचे मुख्य आरोग्य अधिकारी होते. देशात आयसोलेशन वॉर्ड्स आणि व्हायरस रिसर्च लॅब बनविण्यात आली आहे. 68 वर्षीय चेन 2016 पासून आपल्या पदावर आहेत. येत्या 20 मे ला दे पद सोडतील. पद सोडल्यानंतर देखील कोरोना व्हायरसवरील रिसर्चवरच त्यांचे लक्ष्य असेल.

Leave a Comment