जगन्नाथाच्या रथाची बांधणी सुरु


फोटो साभार भास्कर
ओरिसातील जगन्नाथ पुरीची रथयात्रा यंदा होणार की नाही अशी शंका व्यक्त झाली असताना मंदिरात रथशाळेत जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा यांच्या रथनिर्मितीचे काम सुरु झाले आहे. दरवर्षी अक्षयतृतीयेला त्यासाठीची पूजा केली जाते आणि वसंत पंचमीपासून रथनिर्मिती सुरु होते. यंदा लॉक डाऊन मुळे या कामाला १५ दिवस उशीर झाला असून १५० विश्वकर्मा सेवक दिवसाचे १५-१६ तास काम करत आहेत. ते कुणालाही भेटत नाहीत, घरी जात नाहीत आणि रथशाळेत सोशल डीस्टन्सिंगचे पूर्ण पालन करून हे काम केले जात आहे.

मंदिर समिती आणि रथ निर्माण संबंधितानी दिलेल्या माहितीनुसार सर्व विश्वकर्मा ठरवून दिलेली कामे अतिशय जबाबदारीने करत आहेत. रथ तयार कसा करायचा याची माहिती गृहकर्णिका, शिल्पसार या ग्रंथातून दिली गेली असली तरी हे विश्वकर्मा त्याच्या वर्षानुवर्षाच्या पारंपारिक ज्ञानातून हे काम करतात. त्यासाठी अक्षयतृतीयेला दासपल्ला जंगलातून कडूनिंब आणि नारळाची झाडे ग्रामदेवीची पूजा करून आणि तिची परवानगी मागून तोडली जातात. पाहिले झाड तोडले की त्याची पूजा केली जाते.


त्यानंतर वसंतपंचमीला प्रत्यक्ष रथ निर्मितीचे काम सुरु होते. त्यापूर्वी लाकडांची पूजा करून तांदूळ, नारळ अर्पण केला जातो आणि चांदीच्या कुऱ्हाडीने प्रतीकात्मक झाड तोडले जाते. या कामी आठ विविध प्रकारचे कला कारागीर मदत करत असतात. त्यांना विविध नावे आहेत.

पहिले गुणकार कारागीर ते रथाच्या आकाराचे लाकूड निवड करून आकारानुसार कापतात. दुसरे पही किंवा महाराणा रथाच्या चाकांचे काम करतात. कमरकंद किंवा नायक रथासाठी लागणारे खिळे आणि लोखंडी काम करतात. चंदाकार रथ जुळवणी म्हणजे असेम्ब्ली करतात. रुपकार मूर्तिकार लाकूड कापण्याचे तर चित्रकार रंग आणि रथावरची चित्रकारी करतात. सूचिकार हे सजावटीचे कपडे शिलाई, डिझाईन करतात आणि रथ भोई हे सहाय्यक मजूर असतात असे सांगितले जाते.

जगन्नाथाचा रथ १६ चाकांचा, बलरामाचा रथ १४ चाकांचा तर सुभद्रेचा रथ १२ चाकांचा असतो. त्यांना अनुक्रमे गरुडध्वज किंवा नंदीघोष, तालध्वज आणि देवदलन अशी नावे आहेत.

Leave a Comment