शिवछत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा विधिवत पार पाडणार; छत्रपती संभाजीराजे


मुंबई : राज्यभरातील समस्त शिवभक्तांना यंदाच्या वर्षी किल्ले रायगडावर ६ जून रोजी होणा-या छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्याची तयारी कशी असेल, असा प्रश्न पडला आहे. एकीकडे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा तर दुसरीकडे राज्याभोवती वाढणारा कोरोनाचा कहर त्यामुळे यंदाचा राज्याभिषेक सोहळा कसा पार पडेल याकडे सर्व शिवभक्तांचे लक्ष लागून राहिले आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून ६ जून रोजी लाखो शिवभक्त कशाचीही पर्वा न करता दरवर्षी रायगडावर पोहोचत असतात. फक्त महाराजांचा राज्याभिषेक सोहळा डोळ्यांत साठवून घेण्यासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास करुन शिवभक्त गडावर येत असतात.


परंतु यंदाच्या वर्षी कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येमुळे एकही सण साजरा करता आलेला नाही. अशा परिस्थितीत लॉकडाऊन वाढण्याच्या देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशा सर्व परिस्थितीत महाराजांचा राज्याभिषेक विधिवत पार पाडला जाईल. त्या परंपरेमध्ये खंड पडू देणार नसल्याचा शब्द छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी सर्व शिवभक्तांना दिला आहे.


ते म्हणाले, मी सर्व शिवभक्तांना एकच शब्द देतो, की महाराजांचा राज्याभिषेक विधिवत पार पाडला जाईल. त्या परंपरेमध्ये खंड पडू देणार नाही. राजसदरेतील राज्याभिषेक सोहळा सर्व शिवभक्तांना थेट पाहता येईल याविषयी सुद्धा उपाय योजना करण्याचा माझा मानस आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत देखील यासंदर्भात बोलणे झाले आहे.

या महिना अखेरपर्यंत परिस्थिती पाहून योग्य तो निर्णय घेण्यात येईल आणि तो सर्वांना कळवण्यात येईल, असे देखील छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे गेल्या काही दिवसांपासून ते महाराष्ट्रातील विविध भागांतील शिवप्रेमी, इतिहासकार, शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे सदस्य, अनेक दुर्गप्रेमी संस्थांचे सदस्य, संबंधित विविध संघटना, शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, पत्रकार या सर्वांशी चर्चा करत आहेत.

Leave a Comment