कॅनडामधील भारतीयाला मुस्लिम विरोधी पोस्ट केल्यामुळे गमवावी लागली नोकरी


टोरंटो : मुस्लिम विरोधी ट्विट करणे कॅनडामध्ये एका भारतीय वंशाच्या व्यक्तीला महागात पडले असून त्याला या ट्विटमुळे कामावरून काढून टाकण्यात आले आहे. रवी हुड्डा असे या व्यक्तीचे नाव असून कॅनडातील ओंटारिओमघ्ये तो रिअल इस्टेट एजंट म्हणून काम करायचा. 30 एप्रिल रोजी टोरंटोमधील एका महानगर पालिकेने स्थानिक मशिदींमध्ये रमजानच्या महिन्यात लाऊडस्पीकरवर अजान लावण्यास परवानगी दिली होती. त्यानंतर परिसरातील काहीसा वाद निर्माण झाला होता. यासंदर्भातील माहिती ट्विटरवरून ब्रॅम्प्टनचे महापौरांनी दिली होती. त्यांनी त्यावेळी रमजान असा हॅशटॅग देखील वापरला होता.

मुस्लिम समाजाने महापौरांच्या या ट्विटनंतर सरकारच्या निर्णयाचे कौतुक केले होते. कोरोना व्हायरस लॉकडाऊनुमुळे मशिदीत जाता येत नसल्याने हा निर्णय उत्तम असल्याच्या प्रतिक्रिया देण्यात आल्या. दरम्यान सरकारचा हा निर्णय योग्य न वाटल्याने रवी हुड्डा यांनी ट्विट करत त्याला विरोध दर्शवला होता.

यासंदर्भातील वृत्त आज तकने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार हुड्डा याने आपल्या ट्विटमध्ये असे म्हटले होते की, आता काय उंट आणि बकऱ्या चरवणाऱ्यांसाठी वेगळी रांग केली जाईल का? जनावरांची कुर्बानीच्या नावाखाली हत्या केली जाईल का? सर्व महिलांना मतांसाठी बुरखा घालावा असा कायदा बनवण्यात येईल का?’ दरम्यान रवी हुड्डाने त्याचे ट्विट डिलीट केले असले तरी त्याचे काही स्क्रीनशॉट व्हायरल झाले होते. कॅनडाच्या अँटी हेट नेटवर्ककडे त्याची तक्रार करण्यात आली. त्यांनी केलेल्या कारवाईनुसार रवीला त्याची नोकरी गमवावी लागली आहे. त्याला ही नोकरी देशात द्वेष परसवण्याचा आरोप होत गमवावी लागली आहे.

रवीचे एम्प्लॉयर रीमॅक्स कनाडा यांनी देखील निवेदन देत सांगितले आहे की त्याच्या या वक्तव्याशी आपण सहमत नाही आहेत, आता त्याच्याशी त्यांचा काही संबंध नाही आहे आणि या वक्तव्याचे आपण समर्थन देखील करत नाही. त्यांनी रवीला कामावरून काढून टाकल्याची बातमी खरी असल्याचे सांगितले आहे. त्याचप्रमाणे रवीला मॅकव्हिले पब्लिक स्कूलच्या स्कूल काउंसिल पदावरून देखील हटवण्यात आले आहे.

Leave a Comment