विधान परिषदेची एकही जागा न दिल्यामुळे रामदास आठवले नाराज


मुंबई – भारतीय जनता पक्षाने विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी नाकारल्यामुळे पक्षातील ज्येष्ठ नेते नाराज असतानाच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही आता आपली नाराजी व्यक्त केली आहे. चारपैकी एकही जागा भाजपाने न दिल्यामुळे रामदास आठवले यांनी नाराजी जाहीर केली आहे. नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके , डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. अजित गोपछडे, माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील आणि गोपीचंद पडळकर या चार नावांची भाजपच्या केंद्रीय समितीने घोषणा केली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत या चौघांनी उमेदवारी अर्जही दाखल केले.


यावर प्रतिक्रिया देताना रामदास आठवले यांनी ट्विट करत, २१ मे रोजी महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणूक होत असून भाजपने त्यातील एक जागा रिपब्लिकन पक्षाला द्यावी अशी रिपाइंची मागणी होती. मित्रपक्ष म्हणून भाजपाच्या वाट्याला येणाऱ्या चार जागांपैकी एक जागा रिपाइंला न सोडल्याने रिपाइं कार्यकर्ते नाराज आहेत.

रामदास आठवले यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची राज्यात २१ मे रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या नऊ जागांच्या निवडणुकीत एक जागा रिपब्लिकन पक्षाला देण्यात यावी या मागणीसाठी बुधवारी भेट घेतली होती. त्यावर विचार करण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिल्याचे आठवले यांनी सांगितले होते. विधानपरिषदेच्या निवडणूक होणाऱ्या नऊ जागांपैकी पैकी चार जागा भाजपच्या वाटय़ाला येणे निश्चित झाले असून त्यापैकी एक जागा रिपाइंला द्यावी असा आग्रह बैठकीत आठवले यांनी धरला होता. त्यावर भाजपला केवळ चार जागा मिळणार असून राज्यातील अनेक ज्येष्ठ नेत्यांची नावे या जागांसाठी चर्चेत आहेत. इच्छुकांची मोठी रीघ लागली आहे. तरीही एक चांगला मित्र पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्षाला एक जागा सोडण्याबाबत निश्चित विचार करू, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती आठवले यांनी दिली होती. पण रिपाइंला जाहीर झालेल्या यादीत एकही जागा देण्यात आलेली नाही.

Leave a Comment