मी एकदम ठणठणीत; माझ्या प्रकृतीबाबतच्या नुसत्या वावड्या


नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लागू असलेल्या लॉकडाऊनच्या तिन्ही टप्प्या दरम्यान एरव्ही राजकारणात कमालीचे सक्रिय असलेले भाजपचे चाणक्य अमित शहा कुठेच न दिसल्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर असल्याच्या बातम्या अनेक माध्यमांमध्ये झळकू लागल्या होत्या. अमित शहा कुठे गायब झाले, असे प्रश्नही विरोधकांनी विचारायला सुरुवात केली होती. लॉकडाऊनच्या या काळात शहांच्या नावावर तबलिगी जमात प्रकरणावेळी एनएसए अजित डोवाल यांना मध्यस्थी करण्यासाठी पाठविल्याची एकच घडामोड होती. त्यामुळे शंकेची पाल चुकचुकत होती.


पण आज खुद्द अमित शहा यांनी माझ्या प्रकृती अस्वास्थ्याच्या निव्वळ वावड्या असल्याचे म्हटले आहे. याबाबतचा खुलासा त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये, सोशल मि़डीयावर काही मित्रांनी माझ्या प्रकृतीविषयी अनेक अफवा पसरवल्या. त्याचबरोबर काहींनी तर माझ्या मृत्यूसाठीही प्रार्थना केली आहे. कोरोना सारख्या जागतिक महामारीविरोधात देश लढत आहे आणि मी गृह मंत्री म्हणून दिवस रात्र कामात व्यस्त होतो. यामुळे या अफवांकडे लक्ष दिले नव्हते. पण आता जेव्हा माझ्या हे लक्षात आले की माझी तब्येत खराब असल्याचा काल्पनिक आनंद या अफवा पसरविणाऱ्यांना होत आहे, तेव्हा मी यावर खुलासा न करण्याचा निर्णय घेतला.

पण, गेल्या दोन दिवसांपासून माझ्या पक्षाच्या लाखो कार्यकर्त्यांनी चिंता व्यक्त केली, त्यामुळे त्यांच्यासाठी मला समोर यावे लागत असल्याचे शहा यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. मी पूर्णपणे ठणठणीत असून मला कोणताही आजार नाहीय. हिंदू धर्मानुसार अशा प्रकारच्या अफवा प्रकृती आणखी ठणठणीत ठेवतात. यामुळे मी अशा सर्व लोकांकडून एकच आशा व्यक्त करतो, की यापुढे तुम्ही मला माझे काम करू द्याल आणि स्वत:ही कराल. तुमच्याप्रती माझ्या मनामध्ये कोणताही द्वेष नसल्याचे शहा यांनी म्हटले आहे.

Leave a Comment