सृष्टीचे पहिले बातमीदार नारद मुनी यांच्याविषयी काही


फोटो साभार भास्कर
आज ९ मे रोजी नारद जयंती साजरी केली जात आहे. नारदाना देवऋषी म्हटले जाते. तसेच सृष्टीचे पहिले पत्रकार, संदेशवाहक किंवा बातमीदार असेही त्यांना म्हटले जाते कारण ते सतत त्रिलोकात संचार करत असत आणि सर्व बातम्या एका लोकातून दुसऱ्या लोकात (त्रिलोक म्हणजे स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ) देत असत. आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने नारद मुनी संबंधी काही माहिती करून घेणे उपयुक्त ठरेल.

नारद हे ब्रह्माचे मानस पुत्र. ब्रह्मदेवाला सात मानस पुत्र होते त्यातील नारदाचा जन्म त्याच्या कंठापासून झाला असे मानले जाते. मानस म्हणजे मनापासून ज्याची निर्मिती झाली तो. ब्रह्माने त्याला संगीत शिक्षण दिले होते आणि नारदाने लग्न करावे, सृष्टी निर्मितीत मदत करावी असे ब्रह्माला वाटत होते पण नारद विष्णूभक्ती मध्ये रमले होते त्यामुळे त्यांनी ब्रह्माचे ऐकले नाही तेव्हा ब्रह्माने त्यांना अविवाहित राहशील असा शाप दिला होता.


नारद अतिशय विद्वान होते. नीती नियम, न्याय, संगीततज्ञ, औषधाचे जाणकार, श्रुती, स्मृती पुराणाचा इतिहास जाणणारे, व्याकरण, वेदांग, भूगोल खगोल, ज्योतिष, योग यातील प्रकांड पंडित होते. याना हे सारे ज्ञान विष्णुने दिले होते. चारी वेदांचे त्यांना ज्ञान होते आणि प्रत्येक कलेत ते निपुण होते यामुळे अन्य ऋषी काहीही शंका आली तर नारदांना त्या संदर्भात विचारत असत.

पृथ्वीवरील विष्णू भक्ताचे मागणे विष्णूपर्यंत पोहोचविण्याचे काम ते करत. त्यामुळे विष्णुना खुश करायचे असेल तर विष्णूसोबत नारद पूजा करण्याची प्रथा आहे. नारदांनीच वाल्मिकी ऋषींना रामायण लिहिण्यासाठी प्रेरणा दिली, व्यासंकडून भागवत रचना करवून घेतली, प्रह्लाद, धृव याना उपदेश करून विष्णूचे महान भक्त बनविले. इंद्र, चंद्र, युधिष्ठिर, राम, कृष्ण याना उपदेश करून त्यांचे कर्तव्य काय याची जाणीव करून दिली असे मानले जाते. कंसाला आकाशवाणीचा अर्थ त्यानीच सांगितला आणि शिवाकडून जालंदर राक्षसाचा नाश त्यानीच करवून घेतला असे मानले जाते.

नारद जयंती दिवशी उपवास करून सायंकाळी विष्णू आणि नारद मुनी यांची विशेष पूजा करून प्रार्थना केली जाते. रात्री जागरण केले जाते आणि विष्णू सहस्त्रनामाचा पाठ केला जातो.

Leave a Comment