राष्ट्रवादीकडून हे दोन उमेदवार जाणार विधान परिषदेवर!


मुंबई : राज्यात येत्या २१ मे रोजी होणाऱ्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोण उमेदवार रिंगणात उतरणार हे जवळपास निश्चित झाले असून शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांची नावे राष्ट्रवादीकडून जवळपास निश्चित झाल्याचे कळते आहे. तर महाविकासआघाडीत कोणा-कोणाला संधी मिळणार याबाबत उत्सूकता आहे. त्यात विशेषतः राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून कोणाला संधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. शिंदे आणि मिटकरी यांची नावे राष्ट्रवादीकडून पुढे आली असली तरी लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

विधान परिषदेच्या शर्यतीत राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांचे नाव मागे पडल्याचे समजते. नवीन चेहरे घेण्याची चर्चा असली तरी सोलापुरातून माजी आमदार राजन पाटील आणि ठाणे पट्ट्यातून महेश तपासे आणि आशिष दामले यांची नावे देखील समोर आली होती. पण साताऱ्यात लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले यांना धूळ चारण्यात शशिकांत शिंदे यांनी मोलाची भूमिका बजावली होती. पण ते स्वतःची विधानसभेची जागा राखू शकले नाही. पण त्यांना सातारा लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आणण्याची मोठी कामगिरी केल्याचे बक्षीस मिळणार आहे. तसेच अमोर मिटकरी यांनी शिवसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला होता. त्यामुळे राष्ट्रवादीला मोठे यश मिळाले होते.

त्याचबरोबर शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीची नावही निश्चित झाल्याचे कळते आहे. शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे यांची नावे यापूर्वीच निश्चित झाली आहेत. दुसरीकडे काँग्रेस २ जागांसाठी आग्रही असल्याचे समोर आले होते. सहावा उमेदवार देखील महाविकास आघाडीने उभा करावा, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे.

Leave a Comment