मुख्यमंत्र्यांनी अवघ्या 12 तासात पूर्ण केला अमित ठाकरेंना दिलेला शब्द


मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अवघ्या 12 तासात महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित राज ठाकरे यांना दिलेला शब्द पूर्ण केला आहे. पुण्यात अडकलेल्या एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी पाठवण्यात आले असून काल विद्यार्थ्यांची पहिली बस अहमदनगरला रवाना झाली.

पुण्यामध्ये एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी आलेले अनेक विद्यार्थी अडकले होते. घरी जाण्याची मागणी त्यांनी केली असता अमित ठाकरे यांनी या विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. त्यानंतर रात्री 10 वाजण्याच्या सुमारास अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि पुण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न मांडला.


या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत त्यांच्या घरी सोडण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यावर काल पहिली बस अहमदनगरला रवाना झाली आहे. यावर एमपीएससी समन्वय समिती महाराष्ट्र राज्यने ‘@yadravkar व #अमितठाकरे आपल्या प्रयत्नांमुळे लालपरी विध्यार्थ्यांना घेऊन घरी चालली आहे. आम्हास खात्री आहे पुण्यातील प्रत्येक विध्यार्थी जो पर्यंत जाणार नाही, तो पर्यंत आपण नक्कीच पाठपुरावा करणार सलाम आपल्याला’ अशा प्रकारचे ट्विट केले आहे.


दरम्यान, अमित ठाकरें यांनी याशिवाय डॉक्टरांना चार हजार हायप्रोटिन्सयुक्त खाद्यपदार्थांच्या पॅकेट्सची मदत केली आहे. अमित ठाकरे यांनी यापूर्वी निवासी डॉक्टरांना पीपीई किट्स, मास्क आणि बेडशिट्स वाटप केले होते. राज्यात कोरोना विषाणू व अन्य आजारांच्या उपचारासाठी जी रुग्णालये कार्यरत आहेत. त्यांच्या बेड्सची क्षमता स्पष्टपणे नागरीकांना माहीत नसल्यामुळे काही नागरिकांना ऐन आजारात एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात पाठवले जात आहे. तरी रुग्णाचा त्रास कमी करण्यासाठी अमित ठाकरे यांनी पत्र लिहून एक उपाय राज्य सरकारला सुचविला होता.

Leave a Comment