नाथाभाऊ आणि पंकजाताईंना डावलत विधान परिषदेसाठी भाजपने जाहीर केली या उमेदवारांची नावे


मुंबई : येत्या 21 मे रोजी महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त 9 जागांसाठी निवडणूक होणार असून त्याच दिवशी मतमोजणी देखील होणार आहे. भाजपने विधानपरिषद निवडणुकीसाठी आपल्या चार उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. डॉ.अजित गोपचडे, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रणजित सिंग मोहिते यांना भाजपने संधी दिल्यामुळे पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, प्रकाश मेहता यासारख्या नेत्यांना भाजपने चाप लावल्याचे स्पष्ट झाले आहे.

विधानपरिषद निवडणुकीत भाजपने तीन ओबीसी आणि एक मराठा उमेदवार मैदानात उतरवला आहे. डॉ. अजित गोपचडे आणि प्रवीण दटके ओबीसी, गोपीचंद पडळकर धनगर नेते तर रणजितसिंह मोहिते पाटील हे मराठा असा जातीय आणि प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. आज दुपारी 2 वाजता विधानभवनात भाजपचे सर्व उमेदवार उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थिती राहणार आहेत.

दुसरीकडे, विधान परिषदेसाठी गेल्या कित्येक दिवसांपासून अडगळीत पडलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे इच्छूक होते. उमेदवारीसाठी त्यांनी देखील आग्रह धरला होता. त्यांनी त्याबाबत पक्षश्रेष्ठींच्या कानावरही घातले होते. पण, यावेळीही त्यांना डच्चू देण्यात आला आहे. एकनाथ खडसेंसोबतच पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे या दिग्गजांनाही डावलण्यात आल्यामुळे आता या निष्ठावंतांचे राजकीय पुनर्वसन पुन्हा लांबणीवर पडल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

Leave a Comment