ज्यांनी मोदींच्या सभांवर बहिष्कार टाकला त्यांनाच दिली उमेदवारी; नाथाभाऊंनी सोडले मौन


मुंबई – येत्या 21 मे रोजी राज्यातील विधान परिषदेची निवडणूक होणार असल्याचे जाहिर केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले असून, या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय इच्छुकांची तिकिटासाठी चढाओढ सुरू आहे. त्यातच भाजपने विधान परिषद निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर केली. पक्षातील निष्ठावंतांना यात संधी मिळेल, अशी चर्चा सुरू होती. पण, घडले काही वेगळेच… विधान परिषदेच्या निवडणुकीतून या निष्ठावंतांना डावलण्यात आले आहे. विधान परिषदेचे उमेदवार भाजपने केल्यानंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मौन सोडले आहे. पंतप्रधान मोदींच्या सभांवर ज्यांनी बहिष्कार टाकला होता, त्यांनाच संधी देण्यात आल्याचे म्हणत खडसे यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण होण्याची चिन्ह असताना विधान परिषद निवडणुकीची केंद्रीय निवडणूक आयोगाने घोषणा केली. महाराष्ट्र विधान परिषदेच्या ९ जागांसाठी २१ मे रोजी मतदान होणार आहे. भाजपने या निवडणुकीसाठी ४ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. पक्षाकडून प्रवीण दटके, गोपीचंद पडाळकर, डॉ. अजित गोपछडे आणि रणजितसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवाराच्या नावावर भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने देखील शिक्कामोर्तब केले आहे. दरम्यान, या यादीत विधानसभा निवडणुकीत तिकीट कापलेले एकनाथ खडसे आणि परळीत पराभवाचा सामना करावा लागलेल्या पंकजा मुंडे यांचे नाव चर्चेत होते. पण पुन्हा एकदा निष्ठावंतांना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने संधी नाकारल्याचे पुढे आले आहे.

एकनाथ खडसे यांनी ही यादी जाहीर होण्यापूर्वीच विधान परिषदेसाठी इच्छुक असल्याचे पक्षश्रेठीला कळवले होते. पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत नाव नसल्याचे कळल्यानंतर एकनाथ खडसे यांनी आपली भूमिका मांडली आहे. आपण गेली ४० वर्षे पक्षासाठी निष्ठेने काम केले. अनेक चढ-उतार पाहिले आहेत. त्यामुळे विधान परिषदेवर संधी मिळेल अशी अपेक्षा होती. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांवर बहिष्कार घालणारे गोपीचंद पडळकर यांना संधी दिली. राष्ट्रवादीतून आलेल्या रणजित सिंह मोहिते यांनाही पक्षाने संधी दिली. मी, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे यांना डावलण्यात आले. कोणत्या दिशेने पक्ष चालला आहे, याचा विचार करण्याची गरज असल्याचे म्हणत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

Loading RSS Feed

Leave a Comment