मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर देशासह राज्यात लॉकडाउन सुरु असून या लॉकडाऊनमध्येच कुख्यात गँगस्टर आणि माजी आमदार अरुण गवळीच्या घरात लग्न सोहळा पार पडणार आहे. उद्या ८ मे रोजी अरुण गवळीची मुलगी योगिता आणि अभिनेता अक्षय वाघमारे लग्नबंधनात अडकणार आहे.
‘डॅडी’च्या दगडी चाळीत लॉकडाउनमध्येच लग्नसोहळा
29 मार्च रोजी अरुण गवळीच्या मुलगी योगिता आणि अक्षय वाघमारे यांचा विवाहसोहळा पार पडणार होता. पण हा विवाह सोहळा लॉकडाउनमुळे रद्द करावा लागला होता. पण लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात आता काही अटी शिथील करण्यात आल्यामुळे लग्न सोहळा उरकण्याचा निर्णय गवळी कुटुंबाकडून घेण्यात आला आहे. त्यानुसार, उद्या हा विवाह सोहळा पार पडणार आहे. मुंबई आणि पुणे पोलिसांची विशेष परवानगी या लग्न सोहळ्यासाठी घेण्यात आली आहे. मुंबईतील अरुण गवळीच्या बालेकिल्ल्यात म्हणजे दगडी चाळीतच हा विवाहसोहळा पार पडणार आहे. आज हळदीचा कार्यक्रम पार पडणार असून उद्या संध्याकाळी लग्न होणार आहे. या लग्नाला अरुण गवळीसुद्धा उपस्थित राहणार आहे.
सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे या लग्नसोहळ्यात काटेकोरपणे पालन केले जाईल, असे अक्षयने सांगितले. त्याचबरोबर वऱ्हाडी मंडळींना सॅनिटायझर आणि फेस मास्क देखील दिले जाणार आहेत. मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडणार आहे. त्यानंतर मुंबईत परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर धूमधडाक्यात रिसेप्शनचे आयोजन करण्यात येईल, अशीही माहिती अक्षयने दिली.
गेल्या पाच वर्षांपासून अक्षय आणि योगिता एकमेकांना ओळखत होते. त्यानंतर त्यांना कुटुंबियांनी विवाहबंधनात अडकण्याचा सल्ला दिला. त्यानुसार, योगिता आणि अक्षयचा डिसेंबर 2019 मध्ये साखरपुडा झाला होता. जवळचे नातेवाईक आणि मित्र परिवारासह हा साखरपुडा समारंभ एका हॉटेलमध्ये पार पडला होता.