‘न्यायालयीन प्रणाली श्रीमंतांची मदत करते’, निरोप घेताना न्यायाधीश दीपक गुप्तांनी मांडले मत

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश दीपक गुप्ता यांनी कोरोना व्हायरसमुळे व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे आपल्या निरोप समारंभात संबोधन केले. यावेळी बोलताना गुप्ता म्हणाले की, देशाची न्यायालयीन प्रणाली श्रीमंत आणि ताकदवर व्यक्तींच्या बाजूने काम करते. न्यायाधीशांना शहामृगाप्रमाणे आपला चेहरा लपवू नये. त्यांनी न्यायपालिकेतील समस्या ओळखून त्यांच्याशी सामना केला पाहिजे.

गुप्ता म्हणाले की, जेव्हा एखादी श्रीमंत व्यक्ती कारागृहाच्या मागे असेल तेव्हा कायदेशीर यंत्रणा वेगाने कार्य करते. मात्र गरिबांच्या खटल्यांना उशीर होतो. खटल्यांना लवकर गती यावी यासाठी श्रीमंत उच्च न्यायालयात जातात. मात्र गरीब जाऊ शकत नसल्याने त्यांच्या खटल्यांना उशीर होतो. अखंडतेचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी न्यायापालिकेची आहे. संस्थेची अखंडता अशी एक गोष्ट आहे, जी कधीच धोक्यात आणली जाऊ शकत नाही. देशाचा न्यायापालिकेवर विश्वास आहे.

ते म्हणाले की, सर्वात गरीबातील गरीब घटकांच्या घटनात्मक हक्कांचे उल्लंघन केले जाते. ही अशी लोक आहेत, ज्यांचा कोणीही आवाज नाही, ज्यांना समस्या आहेत. जर कोणी या लोकांसाठी आवाज उठवत असेल, तर न्यायालयाने त्यांचे म्हणणे ऐकावे. जर त्यांच्यासाठी काही करता येत असेल तर नक्कीच करावे.

2017 मध्ये दीपक गुप्ता यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्या आधी 2016 मध्ये ते छत्तीसगढ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते.  व्हिडीओ कॉन्फ्रेंसद्वारे पार पडलेल्या या निरोप समारंभात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, अटॉर्नी जनरल केके वेनूगोपाल, महाधिवक्ता तुषार मेहता, सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनचे अध्यक्ष दुष्यंत दवे हे सहभागी झाले होते.

Leave a Comment