18 वर्षीय मराठमोळ्या मुलाच्या स्टार्टअपमध्ये टाटांची गुंतवणूक


मुंबई – दोन दिवसांपूर्वी देशातील आमच्यासहित अनेक माध्यमांमध्ये अशी बातमी आली होती की टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांनी मुंबईमधील ‘जेनेरिक आधार’ फार्मसीची 50 टक्के हिस्सेदारी खरेदी केली आहे. या कराराला कंपनीचा संस्थापक अर्जुन देशपांडे याने दुजोरा दिला, पण त्याने कराराची किंमत देण्यास नकार दिला. अशा परिस्थितीत रतन टाटा यांनी आता कंपनीची 50 टक्के हिस्सेदारी खरेदी केली नसल्याचे ट्विटरच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिले आहे. आपल्या ट्विटमध्ये टाटा यांनी जेनेरिक आधारमध्ये छोटी गुंतवणूक केल्याचे म्हटले आहे.


तत्पूर्वी रतन टाटा यांनी या कंपनीत खासगी गुंतवणूक केल्याचे वृत्त सर्वच माध्यमांमध्ये आले होते. टाटा समूहाशी त्याचा संबंध नाही. रतन टाटा यांनी यापूर्वी ओला, पेटीएम, स्नॅपडील, क्युरीफिट, अर्बन लेडर, लेन्सकार्ट आणि लिब्रेट यासह अनेक स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे.

दरम्यान जगप्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांनी मुंबईच्या 18 वर्षीय अर्जुन देशपांडेच्या फार्मसी रिटेल चेन ‘जेनेरिक आधार’ कंपनीमध्ये 50 टक्के हिस्सेदारी खरेदी केल्याचे वृत्त अनेक माध्यमांमध्ये झळकले होते. संस्थापक अर्जुन देशपांडे याची जेनेरिक आधार ही कंपनी स्वस्त दरांमध्ये औषधे विकते. पण या कराराबाबतची माहिती देताना त्याने कराराची आकडेवारी सांगितली नव्हती. त्याने सांगितले की, टाटा यांनी 3-4 महिन्यांपुर्वी त्याचा प्रस्ताव ऐकला होता. त्यांनी देखील यात उत्सुक असल्याचे सांगितले होते.

रतन टाटांनी ही गुंतवणूक वैयक्तिक स्तरावर केली असून, टाटा ग्रुपशी याचा संबंध नाही. देशपांडेने 2 वर्षांपुर्वी जेनेरिक आधारची सुरूवात केली होती. आता कंपनीचे उत्पन्न वर्षाला 6 कोटी रुपये आहे. हे स्टार्टअप फार्मसी-अग्रीगेटर बिझनेस मॉडेल फॉलो करते. थेट उत्पादकांकडून मालाची खरेदी करून, किरकोळ फार्मसींना विकते. याद्वारे 16 ते 20 टक्के मार्जिन वाचते. सध्या मुंबई, पुणे, बंगळुरू आणि ओडिशातील 30 रिटेलर्स याचा भाग आहेत. कंपनीचे ऑफिस ठाण्यात असून, येथे फार्मासिस्ट, आयटी इंजिनिअर आणि मार्केटिंग प्रोफेशनल्स असे 55 जण काम करतात.

देशपांडेने सांगितले की, एका वर्षात 1000 छोट्या मेडिकल स्टोर्सला जेनेरिक आधारशी जोडण्याचे लक्ष्य आहे. तसेच व्यवसाय महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश, तामिळनाडू आणि दिल्लीमध्ये वाढविण्याचा विचार आहे. कंपनीने डब्ल्यूएचओ-जीएमपी सर्टिफाईड पालघर, अहमदाबाद, पुद्दुचेरी आणि नागपूर येथील उत्पादकांशी भागीदारी केली आहे. अर्जुनने आपल्या पालकांकडून मदत घेत स्वतःची कंपनी सुरू केली होती. त्याच्या आईची फार्मासिट्यूकल मार्केटिंग कंपनी आहे. तर वडिलांचा ट्रॅव्हल एजेंसी आहे.

Leave a Comment