शाहू महाराजांबद्दल केलेल्या “त्या” उल्लेखाबद्दल फडणवीसांचा माफीनामा


मुंबई – छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्याबद्दल केलेल्या ट्विटसंबंधी अखेर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली आहे. आपल्या मनात कधीही शाहू महाराज यांचा अनादर करण्याचे येऊ शकत नाही असे म्हणत त्यांनी आपल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन करताना त्यांचा सामाजिक कार्यकर्ते असा उल्लेख केल्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. भाजपचे राज्यसभेतील खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनीदेखील यानंतर ट्विट करून देवेंद्र फडणवीस यांनी शिव-शाहू भक्तांची माफी मागावी, अशी मागणी केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी अखेर याप्रकरणी ट्विटरवरुन माफी मागितली आहे.

छत्रपती संभाजीराजे यांच्या ट्विटनंतर लगेचच देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली आहे. फडणवीस यांनी ट्विट करत म्हटले आहे की, छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनी केलेल्या ट्विटमध्ये चूक झाल्याचे लक्षात येताच लगेच मी ऑफिसला ते लगेचच दुरुस्त करण्यास सांगितले. आपल्या मनात कधीही शाहू महाराज यांचा अनादर करण्याचे येऊ शकत नाही. तथापि यामुळे शिव-शाहू भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो.


काल म्हणजेच ६ मे रोजी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा स्मृतीदिन होता. फडणवीस यांनी त्यानिमित्ताने ट्विट करून अभिवादन केले. पण त्यात झालेल्या चुकीमुळे फडणवीस यांच्याविरोधात रोष व्यक्त झाला होता. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांना अभिवादन करताना यामध्ये त्यांनी छत्रपती शाहू महाराजांचा उल्लेख ‘थोर सामाजिक कार्यकर्ते’ असा केला. शाहूप्रेमींनी यातील ‘कार्यकर्ते’ या शब्दावर आक्षेप घेत फडणवीस यांच्या टीका केली. त्याचबरोबर अनेकांनी माफीची मागणीही केली.

या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली होती. त्यानंतर काही वेळातच संभाजीराजेंनी एक ट्विट केले. ज्यात फडणवीसांनी माफी मागावी, अशी मागणी केली होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या संपूर्ण प्रकारावर सर्व शिव-शाहू भक्तांची माफी मागावी. माझ्यासहित संपूर्ण राज्यातील शिव-शाहू भक्तांच्या भावना दुखावल्याचे छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी म्हटले होते.

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीही या ट्विटरवरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. संघाच्या मनुवादी विचारांच्या मुशीतून आलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शाहू महाराजांना कार्यकर्ता म्हणून कमी लेखन आश्चर्यकारक नाही. संघाला मनुवाद आणायचा असल्याने महात्मा फुले, शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा कायम आकस केला. मनातील भावना बाहेर आली एवढेच! जाहीर निषेध!, असे ट्विट करत सावंत यांनी टीका केली होती.

Leave a Comment