विशाखापट्टणममध्ये वायू गळतीमुळे एका बालकासह आठ जणांचा मृत्यू


विशाखापट्टणम : आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील एका फार्मा कंपनीतून आज सकाळी वायू गळती झाली असून ही वायू गळती विशाखापट्टणमच्या आर आर वेंकटपुरम गावात एलजी पॉलिमर कंपनीतून झाल्यामुळे एका बालकासह आठ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान नेमकी कशामुळे वायू गळती झाली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

गावासह संपूर्ण शहरात वायू गळतीमुळे तणावाचे वातावरण आहे. खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक प्रशासनाने आजूबाजूची पाच गावे रिकामी केली आहेत. एलजी पॉलिमर कंपनीच्या तीन किमी परिसरात वायू गळतीचा परिणाम दिसत आहे. तेथील नागरिकांना या वायू गळतीमुळे डोळ्यांची जळजळ, डोकेदुखी, उलटी आणि श्वास घेण्यास अडचण असा त्रास होत आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथके घटनास्थळी पोहोचली आहेत. नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. तसेच लोकांनी सुरक्षित ठिकाणी जावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

आठ जणांचा मृत्यू सरकारी रुग्णालयात झाला तर अनेकांची प्रकृती गंभीर आहे. यामध्ये बहुतांश लहान मुले आणि वयोवृद्धांचा समावेश आहे. 150 ते 170 लोकांना सरकारी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. याशिवाय अनेकांना गोपालपुरमच्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. 1500 ते 2000 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.

1961 मध्ये हिंदुस्तान पॉलिमर्स नावाने एलजी पॉलिमर्स इंडस्ट्रीची स्थापना झाली होती. पॉलिस्टायरेने आणि को-पॉलिमर्सची ही कंपनी निर्मिती करते. 1978 मध्ये यूबी ग्रुपच्या मॅकडॉवल अँड कंपनी लिमिटेडमध्ये हिंदुस्तान पॉलिमर्सचे विलिणीकरण झाले आणि मग ही एलजी पॉलिमर्स इंडस्ट्री बनली.

दरम्यान विशाखापट्टणममधील घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त केली असून यासंदर्भात गृहमंत्रालय आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी मी चर्चा केली असून ते या घटनेवर नजर ठेवून आहेत. मी सगळ्यांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करतो, असे ट्विट मोदींनी केले आहे.

त्याचबरोबर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विशाखापट्टणमधील घटनेमुळे आपल्याला मोठा धक्का बसला. या परिसरातील काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांना मी आवाहन करतो की त्यांनी आवश्यक मदत पुरवावी. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या कुटुंबीयांचे मी सांत्वन करतो. तर ज्यांच्यावर उपचार सुरु आहेत, ते लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करतो, असे म्हटले.

Leave a Comment