बुद्धाचे जन्मस्थळ लुम्बिनी


फोटो साभार नेपाळ टुरिझम
आज शांतीदूत बुद्धाची २५६४ वी जयंती साजरी केली जात असून वैशाख पौर्णिमेला दरवर्षी बुद्ध जयंती साजरी केली जाते. नेपाळ येथील लुम्बिनी येथे गौतम बुद्धाच्या जन्म झाला होता. येथे दरवर्षी हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि देश विदेशातून बौद्धधर्मीय मोठ्या संख्येने या स्थळाला भेट देतात. येथे मायावती मंदिरात भव्य प्रमाणात या उत्सवाचे आयोजन केले जाते. यंदा मात्र कोविड १९ मुळे येथील सर्व कार्यक्रम रद्द केले गेले असल्याचे समजते. हा उत्सव यंदा अगदी छोट्या प्रमाणात साजरा केला जात असून गुरुवारी सकाळी विश्वशांती जप आणि सायंकाळी १० भिक्षु आणि नन यांच्या उपस्थितीत २५६४ दीप प्रज्वलित केले जाणार आहेत.

लुम्बिनी विकास ट्रस्टचे मुख्य सचिव ज्ञानिन राय यांनी यंदाचे आंतरराष्ट्रीय बौद्ध संमेलन कोविड १९ मुळे रद्द केले गेल्याची माहिती दिली. राय म्हणाले संमेलन रद्द झाले असले तरी व्हर्चुअल टूरचे आयोजन केले गेले असून सायंकाळी ४ ते ५ या वेळात नेपाळ टुरिझम बोर्ड फेसबुक आणि युट्यूब वर ते लाईव्ह पाहता येणार आहे. त्यासाठी नोंदणी सुरु आहे. दरवर्षी या दिवशी जगभरातून लाखो बौद्ध येथे येतात. गेल्या वर्षी २२ देशातून १० हजार बौद्ध भाविक येथे आले होते.


मायावती मंदिराला युनेस्कोने जागतिक वारसा यादीत स्थान दिले आहे. कपिलवस्तूचा राजा शुद्धोधन आणि राणी मायावती यांच्यापोटी ई.स.पूर्व ६२३ मध्ये गौतम बुद्धाचा जन्म लुम्बिनी येथे झाला होता. त्याचे नाव सिद्धार्थ असे ठेवले गेले होते आणि वयाची २९ वर्षे तो कपिलवस्तूच्या राजमहालात राहिला होता. त्याचे लग्न झाले होते आणि त्याला एक मुलगा होता. त्यानंतर त्याला विरक्ती आल्यावर त्याने घरदार त्यागून शांती मिळविण्यासाठी उपासना केली आणि त्याला ज्ञान प्राप्त झाल्यावर गौतम बुद्ध असे नाव मिळाले होते.

मायावती मंदिराजवळ एक मोठे सुंदर सरोवर आहे. त्याच्या कडेने पणत्या लावल्या जातात. सम्राट अशोकाने लुम्बिनी येथील या मंदिराला भेट दिली होती आणि त्याने तेथे एक स्तंभ बांधला होता. त्याला अशोक स्तंभ असेच नाव असून त्यावर एक शिलालेख कोरला गेला आहे.

Leave a Comment