मारुती सुझुकीसह अनेक ऑटो कारखान्यात काम सुरु


फोटो साभार लाईवमिंट
लॉक डाऊनच्या तिसऱ्या फेजमध्ये उद्योग जगतासाठी दिल्या गेलेल्या सवलती आणि सुविधा यांचा परिणाम आता दिसू लागला आहे. अनेक ऑटो कंपन्यांनी त्यांची शो रूम उघडली आहेत आणि हरियानातील मानेसर येथील मारुती सुझुकी कारखान्यात १२ मे पासून उत्पादन सुरु केले जात असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.

मारुती सुझुकी व्यवस्थापनाकडून दिल्या गेलेल्या माहितीनुसार सरकारच्या सर्व आदेशांचे काटेखोर पालन करून आणि कर्मचारी सुरक्षेची पूर्ण काळजी घेऊन कारखाना पुन्हा सुरु केला जात आहे. मारुतीने त्यांची ६०० शोरूम उघडली असून तेथील मागणी पाहून त्याप्रमाणे उत्पादन केले जाणार आहे. मानेसर येथील कारखाना सुरु करण्याची परवानगी २२ एप्रिल रोजीच मिळाली होती पण बाजारात विक्री सुविधा सुरु झाल्यावरच उत्पादन सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता असे सांगितले जात आहे. कंपनीने उत्पादन सुरु करत असल्याची माहिती शेअर बाजरालाही दिली आहे.

मारुती बरोबरच टायर बनविणारी एमआरएफ यांनीही अंशिक प्रमाणात कारखाना सुरु केला आहे. बजाज ऑटो, मर्सिडीज बेंझ टीव्हीएस मोटर्स, रॉयल एन्फिल्ड, महिंद्र अँड महिंद्र यांचे कारखानेही सुरु केले जात आहेत. अनेक ऑटो कंपन्यानी ग्राहकांना ऑनलाईन कार शॉपिंग सुविधा देऊ केली असून ग्राहकाला कारची डिलीव्हरी घरपोच देण्याची तयारी केली असल्याचेही समजते.

Loading RSS Feed

Leave a Comment