आज दिसणार २०२०चा शेवटचा सुपर मून


फोटो शेअर्ड
गुरुवारी ७ मे रोजी बुद्ध जयंती दिवशी २०२० या वर्षातला शेवटचा सुपरमून पाहण्याची संधी मिळणार आहे. या पूर्वीचा सुपरमून ७ एप्रिल रोजी दिसला होता आणि त्याचे नाव पिंक सुपरमून होते. आज दिसणारा सुपरमून फ्लॉवर सुपरमून आहे. आज चंद्रप्रकाश नेहमीच्या पौर्णिमेच्या तुलनेत अधिक स्वच्छ असेल आणि चंद्र नेहमीपेक्षा १४ टक्के मोठा आणि ३० टक्के अधिक प्रकाशित दिसणार आहे.

सुपरमूनला देण्यात येणारी नावे अमेरिकेतून दिली जातात. मे महिन्यात दिसणारा सुपरमून फ्लॉवर सुपरमून म्हटला जातो आणि हे नाव अमेरिकेतील आदिवासी जमातीने दिलेले आहे. या काळात तेथे वसंत ऋतू असतो आणि त्या काळात उमलणाऱ्या फुलांवरून ही नावे दिली जातात. मे महिन्यातील सुपरमूनला मिल्क मून असेही एक नाव आहे. एप्रिल मधला सुपरमून पिंक मून म्हटला जातो कारण या काळात तेथे गुलाबी रंगाची जंगली फुले फुलतात आणि त्याचे मोठे घोस असतात.


फोटो साभार द एमएएनसी
सुपरमूनला नावे देण्याचा पहिला उल्लेख १९३० च्या अमेरिकन कॅलेंडरमध्ये येतो. त्यात पिंक, एग, फ्लॉवर अशी नावे येतात. मात्र सुपरमून असा पहिला उल्लेख १९७९ साली केला गेला असेही सांगितले जाते. ज्योतिषी रिचर्ड नोल यांच्या म्हणण्यानुसार चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ पोहोचल्यावर दीड तासाने पौर्णिमा सुरु होते. मे महिन्यातली ही पौर्णिमा शुभ असल्याचे सांगितले जात असून यामुळे नकारात्मक उर्जा कमी होणे, अर्थव्यवस्थेला गती मिळणे, निराशेत बुडालेल्या लोकांना आशेचा नवा किरण दिसणे असे परिणाम होऊ शकतात असे म्हटले जात आहे.

या नंतरचा सुपरमून पुढच्या वर्षी २७ एप्रिल २०२१ ला दिसणार आहे.

Leave a Comment