Viral: आता बिहारमधून दिसत आहे माउंट एव्हरेस्ट?

लॉकडाऊनमुळे मनुष्याच्या दैनंदिन जीवनात मोठा बदल झाला असला, तरी पर्यावरणावर याचा चांगला परिणाम होता दिसत आहे. काही दिवसांपुर्वी जालंधर आणि सहारनपूर येथील हिमालायच्या बर्फाच्छादित पर्वतरांगा दिसत असल्याचे फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर आता बिहारच्या सीतामढी जिल्ह्यातून हिमालयाचे शिखर देखील असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हे फोटो सीतामढी जिल्ह्यातील सिंहवाहिनी येथील ग्रामपंचायत प्रमुख रितू जैसवाल यांनी ट्विटरवर शेअर केले. जैसवाल यांच्यानुसार, त्यांच्या गावापासून हिमालायच्या पर्वतरांगाचे हवाई अंतर 190 किमी आहे व 1980 च्या दशकानंतर पहिल्यांदाच गावातून हिमालयाचे शिखर दिसत आहे. छतावरून माउंट एव्हरेस्ट दिसत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

हे फोटो शेअर करताना त्यांनी लिहिले की, आम्ही सीतामढी जिल्ह्यातील सिंहवाहिनी गावातील छतावरून माउंट एव्हरेस्ट पाहू शकतो. निसर्ग स्वतःला संतुलित करत आहे. नेपाळच्या जवळ असलेले शिखर पावसानंतर स्वच्छ वातावरणात कधीकधी दिसत असे, मात्र खऱ्या हिमालयाचे दर्शन गावातून पहिल्यांदाच झाले.

रितू जैसवाल यांनी छतावरून थेट माउंट एव्हरेस्ट दिसत असल्याचा दावा केल्यानंतर, अनेक युजर्सनी हे माउंट एव्हरेस्टच आहे कशावरून ? असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना जैसवाल यांनी गावाच्या भौगोलिक स्थितीची माहिती देत हा दावा खरा असल्याचे म्हटले आहे. सोबत तज्ञांचे देखील मत घेतल्याचे म्हटले आहे.

आयएफएस अधिकारी प्रवीण कासवान यांनी देखील हा फोटो शेअर केला.

Leave a Comment