जगभरात सध्या कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. अशा स्थितीत प्रत्येक देश बिकट आर्थिक स्थितीचा सामना करत आहे. देशातील उद्योगांसाठी आर्थिक पॅकेज देखील प्रत्येक देशातील सरकार जाहीर करत आहे. अशातच सध्या जागतिक स्तरावर एक नाव सध्या आपल्या आर्थिक धोरणामुळे चर्चेत आहे, ते म्हणजे पेरू या देशाच्या 35 वर्षीय अर्थमंत्री मारिया अँटोनियो अल्वा. सर्वजण त्यांना टोनी नावाने हाक मारतात. स्थानिक लोकांमध्ये त्या खूपच लोकप्रिय झाल्या आहेत. या कठीण काळात छोटे उद्योग आणि कुटुंबासाठी जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजसाठी त्यांचे कौतूक केले जात आहे.
या आहेत 35 वर्षीय हॉर्वर्ड प्रशिक्षित ‘रॉकस्टार’ अर्थमंत्री
मागील वर्षी ऑक्टोंबरमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी पदभार स्विकारल्यानंतर, सरकारमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची ठरू लागली आहे. संवाद कौशल्य ही त्यांची जमेची बाजू असल्याचे सांगितले जाते. चाळीशीच्या आतील वयोगटातील इतर देशांच्या अर्थमंत्र्यांमध्ये त्या एकमेव महिला आहेत. अल्वा यांचे मुख्य लक्ष स्थानिक प्रशासनाद्वारे पायाभूत सुविधांना वेग देणे आणि आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांमधील वित्तीय तूट भरणे हे आहे. मात्र लॉकडाऊनंतर कुटुंब आणि उद्योगांच्या मदतीसाठी त्यांनी महत्त्वाचे पावले उचलली आहेत.
मारिया यांनी पेरूवियन यूनिव्हर्सिटी आणि त्यानंतर 2014 मध्ये हॉर्वर्डमधून पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.
मारिया यांनी भारतात देखील काही काळ घालवला आहे. त्यांनी भारतात मुलींसाठी शैक्षणिक संधीचा अभ्यास करण्यासाठी 2 महिने घालवले होते. यानंतर पेरूला परतल्यावर त्यांनी शिक्षण मंत्रालयासोबत काम केले. त्या योजना व बजेटच्या प्रमुख होत्या. बजेट प्रमुख म्हणून त्या अर्थ मंत्रालयात परतल्या व तेथे 150 जणांच्या टीमचे नेतृत्व केले.