मँगोमॅन हाजी कालीमुल्लाह यांनी विकसित केला डॉक्टर आंबा


फोटो साभार हिंदुस्तान टाईम्स
जगभरात मँगोमॅन नावाने प्रसिद्धी असलेल्या लखनौ मलिहाबाद येथील फळबागायतदार आणि पद्मश्री हाजी कलीमुल्लाह खान यांनी कोविड १९ चा मुकाबला करताना जीवाची पर्वा न करता अहोरात्र रुग्णसेवा देऊन स्वतःच्या प्राणाचे बलिदान देणाऱ्या डॉक्टर्स, नर्स आणि अन्य वैद्यकीय स्टाफला मानवंदना देण्यासाठी आंब्याची नवी जात विकसित केली असून त्याला डॉक्टर आंबा असे नाव दिले आहे.

हा आंबा दशहरी आंब्यावर कलम करून विकसित करण्यात आला आहे. हाजी म्हणतात जेव्हा हा आंबा लोक हातात घेतील तेव्हा त्यांना आपल्या सुरक्षेसाठी प्राणार्पण केलेल्या कोविड वॉरीअर्सची आठवण आल्यावाचून राहणार नाही. या आंब्यांमुळे ते लोकांच्या मनात सतत जिवंत राहतील.

हाजी यांनी फळबागेत अनेक यशस्वी प्रयोग केले असून एकच झाडावर ३०० विविध प्रकारचे आंबे येण्याची कामगिरी त्यांच्या नावे आहे. डॉक्टर आंबा मूळ जातीच्या आंब्यापेक्षा अधिक गोड आणि जादा काळ टिकणारा आहे. हाजी यांनी आजपर्यंत पंतप्रधान मोदी, अमित शहा, सचिन तेंडूलकर, ऐश्वर्या राय, योगी आदित्यनाथ. अमिताभ बच्चन यांच्या नावानेही आंबे विकसित केले आहेत. अन्य फळांवर ही त्यांचे हे संशोधन सतत सुरु असते.

त्यांनी अनारकली नावाचा एक आंबाही विकसित केला होता. त्याला दोन वेगळ्या साली आणि आत दोन वेगळे गर होते. विशेष म्हणजे या दोन्ही गरांची चव वेगळी होती.

Leave a Comment