सौदी अरेबियाच्या ‘या’ निर्णयाचा लाखो भारतीयांवर होणार परिणाम

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असताना, आता याचा फटका जागतिक अर्थव्यवस्थेला बसताना दिसत आहे. जगातील सर्वात श्रींमत देशांपैकी एक असलेल्या सौदी अरेबियाला याच्या परिणामांना सामोरे जावे लागणार आहे. येथील लोकांना देखील संकटाचा सामना करावा लागणार आहे.

सौदी अरेबिया खाजगी क्षेत्रातील कंपन्यांना पगारामध्ये 40 टक्क्यांपर्यंत कपात करण्याची परवानगी देणार आहे. सौदी अरेबियात काम करणाऱ्या लोकांचा करार देखील समाप्त केला जाऊ शकतो. सौदी अरेबियात 26 लाख भारतीय राहतात आणि या निर्णयाचा त्यांच्यावर परिणाम होणार आहे.

आजतकच्या वृत्तानुसार, सौदी अरेबियाच्या मानव संसाधन आणि सामाजिक विकास मंत्रालयाने कामगार कायद्यात बदल करण्यास परवानगी दिली आहे. या बदलानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात पुढील 6 महिने 40 टक्के कपात केली जाऊ शकतात. मात्र कर्मचाऱ्यांचा करार लवकर रद्द करण्याची घाई करू नये, असे सांगण्यात आले आहे. यासाठी कर्मचाऱ्यांना वेतनभत्ता, सरकारी शुल्कात सूट मिळू शकते. कर्मचाऱ्यांचा करार रद्द करण्यासाठी तीन अटी ठेवण्यात आलेल्या आहेत. यामध्ये वेतन कपातीचा निर्णय लागू होऊन 6 महिने झालेले असणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांच्या सर्व सुट्ट्या संपलेल्या असाव्यात आणि कंपन्यांनी ते आर्थिक संकटाचा सामना करत असल्याचे सिद्ध करावे. सरकारच्या मंजूरीनंतर हा निर्णय लागू होईल.

यामुळे सौदी अरेबियामध्ये काम करणाऱ्या भारतीय कामगारांच्या नोकऱ्यांवर संकट आहे व बेरोजगार झाल्यावर भारतात परतण्याची शक्यता आहे. भारत सरकार नागरिकांसाठी शिप आणि विमान देखील पाठवत आहे. सौदी अरेबियाच्या केंद्रीय बँकेत विदेशी चलन साठ्यात मार्च महिन्यात मागील 20 वर्षात सर्वाधिक वेगाने घट झाली आहे. विदेशी चलन साठ्यात समतोल राखण्यासाठी सौदी अरेबिया यावर्षी 26 अब्ज डॉलर्स कर्ज घेण्याचाही विचार करत आहे.

Leave a Comment