निधनानंतर ऋषी कपूर यांची इंटरनेटवर 7000 टक्क्यांनी वाढली शोधाशोध


हिंदी सिनेसृष्टीत एकेकाळी चॉकलेट बॉय अशी ओळख असणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी मागील गुरुवारी जगाचा अचानक निरोप घेतल्यामुळे बॉलीवूडसह त्यांचे चाहते देखील शोकमग्न झाले. त्यांच्या या अचानक एक्झिटमुळे सोशल मीडिया देखील हळहळला. पण ऋषी कपूर यांनी त्यांच्या निधनानंतरही एक विक्रम नोंदवला आहे. कारण निधनानंतर त्यांच्या नावाने इंटरनेट त्यांची शोधाशोध सुरु झाली. ज्यादिवशी ऋषी कपूर यांनी जगाचा निरोप घेतला त्यादिवशी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी तब्बल 14 हजारांपेक्षा जास्त ट्विट केले गेले. त्याचबरोबर त्यांच्या नावाच्या ऑनलाईन सर्चमध्ये 7000 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली. तसेच ही वाढ जागतिक स्तरावर 6 हजारांपेक्षा जास्त टक्क्यांची होती.

ज्यादिवशी ऋषी कपूर यांचे निधन झाले त्यादिवशी शॉकिंग इमोजीचा सर्वाधिक वापर केला गेला. सोशल मीडियावर ऋषी कपूर यांच्या निधनावर त्यांना श्रद्धांजली वाहणाऱ्या या पोस्ट पडू लागल्या आणि 2988 लोकांनी या पोस्टमध्ये शॉकिंग इमोजीचा वापर केला. दुस-या क्रमांकावर ब्रोकेन हार्ट इमोजीचा तर तिस-या क्रमांकावर रडणा-या इमोजीचा वापर केला गेला. चौथ्या क्रमांकावर डाव्या डोळ्यांतून अश्रूंचा इमोजी यूज झाला आणि यानंतर बुके आणि ब्रोकेन ब्लॅक हार्ट इमोजी वापरला गेला.

सोशल मीडियावर ऋषी कपूर विशेषत: ट्विटरवर प्रचंड सक्रिय असायचे . दोन एप्रिलनंतर ट्विटरवर सोशल मीडियावर सक्रिय असणा-या ऋषी कपूर यांनी कोणतेही ट्विट केले नसल्यामुळे गेले काही दिवस त्यांची प्रकृती बरी नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. त्यानंतर, त्यांना बुधवारी अचानक रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची बातमी आली आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना रूग्णालयात भरती करण्यात आल्याचे सांगितले गेले. दुस-या दिवशी सकाळी रूग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि बॉलीवूडचा आणखी एक तारा निखळला.

Leave a Comment