आरोग्यविषयक सेवांसाठी नीति आयोगाचे ‘आरोग्यसेतू मित्र’ संकेतस्थळ

आरोग्य सेतू अ‍ॅप तयार करण्यात मुख्य भूमिका असलेल्या नीति आयोगाने आरोग्यसेतू मित्र वेबसाईट लाँच करण्यासाठी आता पंतप्रधानांच्या प्रिंसिपल सायंटेफिक अ‍ॅडवायझरसोबत भागीदारी केली आहे. कोव्हिड-19 संकटाच्या काळात लोकांना घरपोच आरोग्य सेवा पोहचविण्याच्या उद्देशाने वेबसाईट सुरू करण्यात आली आहे. यात अनेक संस्था, इंडस्ट्री आणि स्टार्टअप्स देखील सहभागी झाले आहेत. या वेबसाईटद्वारे नागरिकांना डॉक्टरांकडून मोफत आरोग्य सल्ला आणि घरपोच औषधांची सुविधा मिळेल.

लॉगइन केल्यावर या साईटवर डॉक्टरांचा सल्ला, होम लॅब टेस्ट आणि ईफार्मसी असे तीन पर्याय मिळतील. होम लॅब टेस्टसाठी डॉ. लाल पॅथलॅब्स, एसआरएल डायग्नोस्टिक्स, मेट्रोपोलिस, थायरोकेअर आणि इतर लॅबशी भागीदारी करण्यात आली आहे. याद्वारे कोठे टेस्टिंग करायचे, याची माहिती मिळेल. तर ईफार्मसी पर्यायाद्वारे 1एमजी, नेटमेड्स.कॉम, मेडलाईफ आणि फार्मईजी याद्वारे औषधे मागवता येतील.

कंसल्टिंग डॉक्टर पर्यायाद्वारे, ईसंजीवनी ओपीडी, स्वास्थ, स्टेपवन, टाटा ब्रिडजिटल हेल्थ, टेक महिंद्राच्या कनेक्टसेंस टेलिहेल्थ प्लॅटफॉर्मशी संपर्क साधू शकतात. चॅट, कॉल अथवा व्हिडीओ कॉन्फ्रेसिंगद्वारे संवाद साधणे शक्य आहे. याशिवाय या वेबसाईटसाठी कोणतेही वेगळे अ‍ॅप लाँच करण्यात आले नसून, आरोग्य सेतू अ‍ॅपमध्येच वेबसाईटचा पर्याय मिळेल.

Leave a Comment