18 ते 23 जुलै दरम्यान IIT-JEE (MAIN) ची, तर 26 जुलै रोजी NEET परीक्षा


नवी दिल्ली : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी आज जेईई आणि नीट परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या परीक्षा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भवामुळे रद्द करण्यात आल्या होत्या. आता नव्या वेळापत्रकानुसार JEE MAIN ची परीक्षा 18 ते 23 जुलै दरम्यान घेण्यात येणार आहे. तर 26 जुलै रोजी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आवश्यक असणारी NEET परीक्षा घेण्यात येणार आहे.

याबाबत सविस्तर माहिती देताना केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी सांगितले की, 18, 20, 21, 22 आणि 23 जुलै रोजी IIT-JEE (MAIN) परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. तर काही दिवसांत ऑगस्टमध्ये आयोजित होणाऱ्या IIT-JEE अॅडव्हान्स परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. तसेच 26 जुलै रोजी NEET परीक्षा घेण्यात येणार आहे.

देशभरातील इंजिनिअरिंग महाविद्यालयांमध्ये जेईई परीक्षांमार्फत प्रवेश देण्यात येतो. तर राष्ट्रीय पात्रतेसह घेण्यात येणाऱ्या NEET परीक्षेमार्फत देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्यात येतो. नीट परीक्षेसाठी देशभरातील 15 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. या परीक्षेमार्फत देशभरातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्यात येतो. तर 9 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी जेईई-मेंस परीक्षेसाठी अर्ज केला आहे. जेईई मेन्स परीक्षेमार्फत आयआयटी वगळता इतर इंजिनिअरिंग महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्यात येतो. जेईई मेन्स परीक्षा जेईई अॅडवान्स परीक्षेसाठी महत्त्वाची मानली जाते. जेईई अॅडवान्स परीक्षेमार्फत आयआयटीमध्ये प्रेवश देण्यात येतो. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी सांगितले की, लवकरच केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (सीबीएसई) च्या 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांच्या तारखाही जाहीर केल्या जातील.

Leave a Comment