छोट्या उद्योगांचे कर्ज माफ करा, गरिबांना पैसे द्या – अभिजित बॅनर्जी

कोरोना व्हायरस महामारीमुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभुमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी देशातील प्रतिष्ठित अर्थतज्ञांशी चर्चा करत आहेत. काही दिवसांपुर्वीच राहुल गांधी यांनी आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्याशी संवाद साधला होता. आता राहुल गांधी यांनी नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ अभिजित बॅनर्जी यांच्या अर्थव्यवस्थेविषयी चर्चा केली.

यावेळी बॅनर्जी म्हणाले की, आपल्या समोर दोन समस्या आहेत. एक म्हणजे उद्योगांना दिवाळखोर होण्यापासून कसे वाचवावे. कर्जमाफी एक उपाय असू शकतो. दुसरी मोठी समस्या म्हणजे मागणी कमी होणे ही आहे. यासाठी गरीबांना काही पैसे दिले जाऊ शकतात. तळागाळातील 60 टक्के लोकांना थोडे अधिक पैसे दिल्यास कोणतेही नुकसान होणार नाही.

ते म्हणाले की, आपण आतापर्यंत कोणतेही मोठे आर्थिक पॅकेज घोषित केलेले नाही. आपण जे पॅकेज दिले आहे, ते जीडीपीच्या 1 टक्के आहे. आपल्याला मदत निधी वाढविण्याची गरज आहे. कर्ज माफ केल्यास लोकांना मोठी मदत मिळेल. लोकांच्या हातात पैसा हवा, जेणेकरून ते खरेदी करू शकतील. त्यांना पैसे दिल्यास हे शक्य होईल. अर्थव्यवस्थेला सुरळीत करण्यासाठी खर्च करणे सर्वात चांगला पर्याय आहे. यामुळे लहान उद्योगांकडे पैसे येईल व ते देखील खर्च करतील. अशाप्रकारे एक साखळी तयार होईल.

जनधन खातेधारकांना पैसे मिळतील. मात्र अनेकांचे खाते नाहीत. प्रवासी मजूरांकडे तर असे नाही. आपल्याला लोकसंख्येच्या मोठ्या भागाचा विचार करायला हवा. अशावेळी राज्य सरकारला पैसा द्यावा, जे आपल्या योजनांद्वारे लोकांपर्यंत पोहचतील. तात्पुरते रेशन कार्ड द्यावे. हे सर्वांसाठी तीन महिन्यांपुरते द्यावे व नंतर आवश्यक असल्यास रिन्यू करावे. आपल्याकडे पर्याप्त भंडार असून, दीर्घकाळ ही योजना चालवू शकू, असेही ते म्हणाले.

Leave a Comment