स्वस्त इंधनाचा भारताने केला साठा


फोटो साभार इंव्हेन्तिवा
करोना लॉकडाऊन मुळे जगभरात कच्च्या इंधन तेलाच्या किमती घसरल्याचा फायदा भारताने घेतला असून या तेलाची शक्य तेवढी साठवण केली असल्याचे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सोमवारी सांगितले. प्रधान म्हणाले हे तेल भारताने भूमिगत साठवण केंद्रे, टँक्स, जहाजे आणि पाईपलाईन मधून साठविले आहे. या अंतर्गत ३.२ कोटी टन इंधन साठा केला गेला असून तो भारताच्या एकूण मागणीच्या साधारण २० टक्के आहे.

जगात सर्वाधिक कच्चे तेल आयात करणाऱ्या देशात भारताचा नंबर तिसरा आहे. भारताच्या इंधन गरजेचा ८५ टक्के हिस्सा आयात केला जातो म्हणजेच त्यासाठी भारत दुसऱ्या देशांवर अवलंबून आहे. कोविड १९ मुळे पुकाराव्या लागलेल्या लॉक डाऊन मुळे सध्या सर्वत्र तेलाची मागणी कमी आहे त्यामुळे दर घसरले आहेत. यापूर्वी अशी वेळ क्वचितच आली होती. सौदी, युएई, इराक कडून भारताने खरेदी केलेल्या इंधनापैकी ५३.३ लाख टन तेलं जमिनीखालील साठवण टाक्यात साठविले गेले आहे.

प्रधान म्हणाले भविष्यात तेलाच्या किमती अवाच्यासव्वा वाढल्या अथवा पुरवठा अपुरा होऊ लागला तर या तेलाचा वापर केला जाणार आहे. जहाजांवर ७० लाख टन इंधन साठविले गेले आहे तर २.५ कोटी टन तेलं आंतरराष्ट्रीय डेपो, टँक, रिफायनरीजच्या पाईपलाईन्स मध्ये, प्रोडक्ट टँक मध्ये साठविले गेले आहे.

Leave a Comment