अमेझॉन, फ्लिपकार्टवर ग्राहकांची दणकून खरेदी, या वस्तूंना प्रचंड मागणी


फोटो साभार नॅॅशनल हेराल्ड
अमेझॉन आणि फ्लिपकार्टने ४ मे पासून देशातील ग्रीन आणि ऑरेंज झोन मध्ये जीवनावश्यक वस्तूंबरोबरच अन्य वस्तूंची डिलीव्हरी सुरु केल्याबरोबर नागरिकांनी ऑनलाईन खरेदीचा दणका लावला असल्याचे दिसून आले आहे. यात प्रामुख्याने कपडे, स्मार्टफोन, मोबाईल एक्सेसरीज याना सर्वाधिक मागणी असल्याचे दिसून आले आहे. भारतात लॉक डाऊनची मुदत १७ मे पर्यंत वाढविली गेली असली तरी ४ मे पासून देशाच्या विविध जिल्ह्यात ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोन जाहीर करून त्याप्रमाणे काही सवलती दिल्या गेल्या आहेत.

अमेझॉन आणि फ्लिपकार्टने बाकी वस्तूंची डिलीव्हरी सुरु केल्याने छोट्या व्यावसायिकांच्या गेले ४० दिवस बंद असलेल्या व्यापाराला चालना मिळाली आहे. अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर ग्राहकांकडून उन्हाळी कपडे म्हणजे टी शर्ट्स, बर्मुडा, स्कर्ट आणि अंडर गारमेंट् मोठ्या प्रमाणावर सर्च केली जात आहेत. त्याचबरोबर पर्सनल ग्रुमिंग, हेअर रीमुव्हर, हेअर क्लीपर, ट्रीमर्स, घरगुती सामानात डास रॅकेट्स, मच्छरदाण्या, एलईडी बल्ब, प्रेशर कुकर, पाणी बाटल्या, बेडशीट, टॉवेल याना अधिक मागणी आहे.

मोबाईल फोन एक्सेसरीज, इअरफोन्स या वस्तूही ग्राहक मोठ्या प्रमाणावर मागवीत असल्याचे फ्लिपकार्ट ग्रुपचे वरिष्ठ उपाध्यक्ष रजनीश कुमार यांनी सांगितले. ते म्हणाले आम्ही १ लाखाहून अधिक एमएसएमई आणि विक्रेत्यांच्या संपर्कात आहोत. लॉक डाऊन मुळे ग्राहक घरबसल्या खरेदीला अधिक प्राधान्य देत आहेत. स्नॅपडील नेही छोट्या शहरात पुन्हा डिलीव्हरी सेवा सुरु केली आहे.

Leave a Comment