मजुरांच्या रेल्वे तिकीटांच्या पैशावरून सरकार-विरोधी पक्षांमध्ये जुंपली

लॉकडाऊनमुळे परराज्यात अडकलेल्या कामगारांसाठी सरकारने आपल्या घरी जाण्यासाठी स्पेशल रेल्वेची सोय केली आहे. मात्र सरकार या कामगारांकडून तिकीटाचे पैसे घेणारे असल्याचे सांगितले जात होते. या मुद्यावरून काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्ष आणि सत्ताधारी भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे.

काँग्रेसने भाजपवर कामगारांच्या स्थितीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला आहे. तर भाजपने हे आरोप नाकारत या प्रवासाचे पैस भारतीय रेल्वे आणि राज्य सरकार देणार असल्याचे म्हटले आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देखील काँग्रेस पक्ष या गरीब कामगारांच्या प्रवासाचा संपुर्ण खर्च उचलेल असे म्हटले आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, एकीकडे रेल्वे दुसऱ्या राज्यात अडकलेल्या मजूरांकडून पैसे घेत आहे. तर दुसरीकडे रेल्वे मंत्रालय पीएम केअर्स फंडमध्ये 151 कोटी रुपयांचे निधी देत आहे. हे कोडे जरा सोडवा.

भाजप प्रवक्ते संबित पात्रा हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले की, कोणत्याही प्रवासी मजूराकडून प्रवासासाठी पैसे घेतले जाणार नाहीत. त्यांच्या प्रवासाचा संपुर्ण खर्च भारतीय रेल्वे आणि राज्य सरकार करणार आहे. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी देखील याची पुष्टी केली.

या प्रकरणावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, या लोकांकडे मागील काही आठवड्यांपासून उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही. त्यामुळे मानवतेच्या दृष्टीने केंद्राने त्यांच्याकडून पैसे आकारू नये.

या प्रकरणावरून जनता दल (सेक्युलर) नेते एचडी कुमारस्वामी, नॅशनल कॉन्फ्रेंसचे ओमर अब्दुल्ला, सीपीएमचे सीताराम येच्युरी आणि समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांनी देखील सरकारवर निशाणा साधला आहे.

Leave a Comment