दारूच्या दुकानाबाहेर तळीरामांच्या लांबच लांब रांगा, सोशल डिस्टेंसिंगचे नियम धाब्यावर

सरकारने लॉकडाऊनच्या नियमांमध्ये सूट दिल्यानंतर आता दारूच्या दुकानांबाहेर खरेदीसाठी लांबच्या लांब रांगा दिसू लागल्या आहेत. दिल्लीपासून ते महाराष्ट्रात देखील अनेक ठिकाणी आज सकाळपासूनच दारूच्या दुकानाबाहेर लांब रांगा दिसत आहे. दिल्लीत जवळपास 150 दारूची दुकाने उघडण्यात आली असून, सकाळी 7 वाजल्यापासून लोकांनी रांगा लावल्या आहेत.

दुकान उघडले नसतानाही सकाळापासूनच तळीरामांनी दुकानाबाहेर गर्दी केली आहे. दिल्लीच्या काश्मिरी गेट येथे दारूच्या दुकानाबाहेर रांगेत उभे असताना सोशल डिस्टेंसिंगचे पालन न केल्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला आहे.

सरकारने देशभरातील दारूचे दुकाने उघडण्याची परवानगी दिली असली तरी सोशल डिस्टेंसिंगच्या नियमांची सक्त अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे. अनेक ठिकाणी सोशल डिस्टेंसिंगचे पालन न करत गर्दी केल्यामुळे दुकाने देखील बंद करण्यात आली आहेत.

दिल्लीतील एका दारूच्या दुकानासमोर तर 1 किलोमीटर लांब रांग लागली होती. तर कर्नाटकमध्ये नागरिकांनी चक्क फुले, नारळद्वारे दुकानांसमोर पुजा केली.

Leave a Comment