एचआयव्ही, डेंग्यूप्रमाणे कोरोनावरील लस विकसित न होण्याची शक्यता – रिपोर्ट

जगभरात सध्या कोरोना व्हायरसवरील औषध, लस शोधण्याचे काम सुरू आहे. मात्र प्रमुख आरोग्य तज्ञांनी याबाबत केलेला दावा चिंतेत टाकणारा आहे. आरोग्य तज्ञांच्या मते, ज्या प्रमाणे एचआयव्ही आणि डेंग्यूसह काही आजारांवर लस बनू शकली नाही, त्या प्रमाणेच कोरोना व्हायरसवरील लस न बनण्याची शक्यता आहे. जगभरात सध्या 100 पेक्षा अधिक लस प्री-क्लिनिकल ट्रायल्समध्ये आहेत. अमेरिका आणि इंग्लंडमधील लसीचे मानवी परिक्षण सुरू आहे.

इंपीरियल कॉलेज लंडनचे ग्लोबल हेल्थ प्राध्यापक डॉ. डेव्हिड नॅबरो म्हणाले की, असे अनेक व्हायरस आहेत ज्यावर अद्याप लस उपलब्ध नाही. आपण दाव्याने नाही सांगू शकत की लस तयार होईल आणि जरी उपलब्ध झाली तरी प्रभाव आणि सुरक्षेच्या सर्व चाचण्या पार करते की नाही, हा ही प्रश्न आहे. लस निर्मितीची प्रक्रिया हळू आणि वेदनादायक आहे.

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ एलर्जी अँड इन्फेक्शियस डिजीजचे डायरेक्टर एंथनी फौसी यांच्यासह काही तज्ञांचे म्हणणे आहे की लस 1 वर्ष ते 18 महिन्यात उपलब्ध होईल. तर काहींच्या मते याला अधिक वेळ लागेल.

नॅबरो म्हणाले की, तुम्हाला खूप आशा असते. मात्र ही आशा भंग पावते. आपण बायोलॉजिक प्रणालीचा सामना करत आहोत, आपण मॅकेनिकल प्रणालीशी सामना करत नाही आहोत. आपले शरीर कशी प्रतिक्रिया देते, त्यावर हे निर्भर आहे.

अमेरिकेतील ह्यूस्टनमधील बायलोर कॉलेज ऑफ मेडिसिनमध्ये नॅशनल स्कूल ऑफ ट्रोपिकल मेडिसिनचे डीन डॉक्टर पीटर होत्ज म्हणाले की, आतापर्यंत 1 वर्ष 18 महिन्यात आपण लस तयार केलेली नाही. मात्र याचा अर्थ हे अशक्य आहे, असे नाही. आपल्याकडे प्लॅन ए आणि प्लॅन बी असणे आवश्यक आहे.

Leave a Comment