दुर्गम भागातील एटीएम मध्ये कॅश भरणाऱ्या या कॅरोना वॉरीयर्स


फोटो साभार भास्कर
संपूर्ण देशभरात करोनाचे संकट तीव्र होत असताना डॉक्टर्स, नर्सेस, स्वच्छता कर्मचारी, पोलीस, सेना दल नागरिकांच्या सेवेसाठी अहोरात्र झटत आहेत. त्याच कडीत देशाच्या दुर्गम भागातील एटीएम मशीन मध्ये कॅश भरण्याचे काम करोनाची पर्वा न करता तिघी महिला करत आहेत त्यामुळे त्याही एक प्रकारे करोना वॉरीयर्स ठरल्या आहेत. कोण आहेत या बहादूर महिला ?

देशभरातील ६० हजार एटीएम मॅनेज करणाऱ्या एजीएस ट्रान्झॅक्ट टेक्नॉलॉजी लिमिटेड कडे १२ हजार कर्मचारी आहेत. त्यातील ४५०० कॅश कस्टोडीयन आहेत. त्यात महिलांची संख्या आहे फक्त तीन. देशातील सर्वाधिक उंचीवरचे लडाख कारगील मधील एटीएमच्या कॅश कस्टोडीयन आहेत २७ वर्षीय जाकियाबानो. त्या रोज सकाळी कॅश, एक व्हॅन ड्रायव्हर आणि अन्य एका सहकार्यासोबत फिल्ड मध्ये जातात आणि एटीएम मध्ये कॅश ठेवतात. करोनाची भीती वाटत नाही का असे विचारल्यावर त्या सांगतात, आमच्याकडे फार केसेस नाहीत आणि आम्ही पूर्ण खबरदारी घेऊनच बाहेर पडतो. आम्ही गेलो नाही तर आमच्या भागातील नागरिकांना पैसे कसे मिळणार?

जम्मू मध्ये बिल्किस बानो कॅश कस्टोडीयन म्हणून काम करतात. त्यांनी या कामाचे प्रशिक्षण घेतले आणि कामाला सुरवात केली. त्या आठ महिन्याच्या गरोदर आहेत मात्र तरीही एकही दिवस खाडा न करता काम करत आहेत. कंपनीने त्यांना करोना धोका लक्षात घेऊन सुटी घेण्याची परवानगी दिली आहे पण त्यांनी सुटी घेण्यास नकार दिला आहे. त्या म्हणतात देशावरचे हे संकट आहे त्यात आम्ही सेवा द्यायलाच हवी. देशाच्या संकट काळात आपणही काही योगदान देऊ शकलो ही आठवण आमच्यासाठी मोठी आहे.

३३ वर्षीय सईदा या तिसऱ्या कॅश कस्टोडीयन आहेत. त्या म्हणाल्या संकट आहे पण आम्ही पूर्ण सावधगिरीने काम करतो आहोत. सध्या कॅश काढण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी रोज जाऊन एटीएम तपासणी करून आवश्यक कॅश भरावी लागते. या आणि अशाच अनेक कॅश कस्टोडीयनच्या कामगिरीमुळे देशात एटीएम मध्ये कॅशची चणचण नाही असे एजीएस ट्रान्झॅक्ट टेक्नॉलॉजी लिमिटेडच्या एचआर विभागाचे प्रमुख पार्थ सामाई यांनी सांगितले.

Leave a Comment